वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचे बहुप्रतिक्षित वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आयपीएल कार्यकारिणीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. अर्थात, दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी शुक्रवारी रुपरेषा जाहीर केली जाईल, असे म्हटले होते. पण, प्रत्यक्षात त्यादिवशी मंडळाकडून काहीही घोषणा झाली नव्हती. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत दुबई, अबुधाबी व शारजा या तीन ठिकाणी खेळवली जाणे अपेक्षित आहे.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी सर्व संघ ऑगस्टमधील तिसऱया आठवडय़ाच्या आसपास युएईमध्ये पोहोचले आणि क्वारन्टाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष सरावाला देखील सुरुवात केली आहे. चेन्नई सुपरकिंग्स हा सराव सुरु करणारा शेवटचा संघ ठरला. त्यांनी कोव्हिड-19 च्या तिसऱया टप्प्यातील चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी सरावाला सुरुवात केली होती.
मागील आठवडय़ात चेन्नईच्या पथकातील दीपक चहर व ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंसह 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती व या पार्श्वभूमीवर चेन्नई पथकातील सदस्यांचा क्वारन्टाईन कालावधीही वाढवण्यात आला होता. पुढे त्यांनी क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केला आणि दुसरीकडे, उर्वरित सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.
पुढे बीसीसीआय वैद्यकीय पथकाला सहाय्य करणाऱया एका सदस्याला कोरोना असल्याचे आढळून आल्याने आणखी अडचण वाढली व या सर्व पार्श्वभूमीवर, आयपीएलची रुपरेषा अद्याप जाहीर केली गेलेली नाही. तूर्तास, या स्पर्धेला जेमतेम 13 दिवसांचा कालावधी बाकी असून बीसीसीआय आज तरी वेळापत्रक जाहीर करणार का, हे येत्या 24 तासात निश्चित होईल.
मुंबई इंडियन्सची एनबीएप्रमाणे स्मार्ट रिंग

कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी आयपीएल स्पर्धेतील प्रँचायझींनी देखील नवे फंडे वापरण्यास सुरुवात केली असून मुंबई इंडियन्सने एनबीएप्रमाणे आपल्या खेळाडूंसाठी स्मार्ट रिंगची कल्पना यंदा प्रत्यक्षात साकारली आहे. ही स्मार्ट रिंग प्रत्येक खेळाडू परिधान करेल आणि शारीरिक स्थिती या रिंगच्या माध्यमाने स्पष्ट होईल, अशी यामागे संकल्पना आहे.
बीसीसीआयने यापूर्वी ब्लूटूथने जोडले जाणारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग डीव्हाईस उपलब्ध करुन दिले आणि एका ऍपमध्ये रोज फिटनेस फॉर्म भरण्याची सूचना केली होती. त्यापेक्षा एक पुढे पाऊल टाकत मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने स्मार्ट रिंग आणली आहे. या स्मार्ट रिंगद्वारे शरीराचे तापमान, पल्स रेट आदी बाबी नोंद होतील.
मुस्तफिजूरला बांगलादेश मंडळाने परवानगी नाकारली

बांगलादेश क्रिकेट मंडळाने जलद गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएल खेळण्याची परवानगी नाकारली. आपण ना हरकत दाखल देऊ शकत नाही, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाने त्याला कळवले. बांगलादेशचा संघ आयपीएल स्पर्धेदरम्यानच लंका दौऱयावर जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, रहमानला परवानगी नाकारली गेल्याची शक्यता आहे. ही मालिका 24 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी रहमानशी संपर्क साधला होता. यापैकी मुंबईने लसिथ मलिंगाऐवजी जेम्स पॅटिन्सनला करारबद्ध केले तर केकेआरला हॅरी गर्नीऐवजी अद्याप पर्यायाचा शोध आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळाने यापूर्वी आयपीएल लिलावात नाव नोंदणीसाठी परवानगी दिली होती. पण, नंतर दुखापतीचा धोका टाळण्यासाठी क्लब स्तरावरील टी-20 स्पर्धांमध्ये त्याने खेळू नये, अशी त्यांची भूमिका होती. मुस्तफिजूरने आयपीएलमध्ये 24 सामने खेळले असून त्यात 28.54 च्या सरासरीने 24 बळी घेतले आहेत. लंका दौऱयाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट मंडळ आपल्या संघासाठी एका आठवडय़ाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार असून त्याची सुरुवात दि. 21 सप्टेंबर रोजी होईल. मुस्तफिजूरचा त्यात सहभाग असणे बांगलादेश मंडळाला अपेक्षित आहे.









