कोलकाता / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील विविध क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक एकीकडे पूर्णपणे कोलमडलेले असताना दुसरीकडे, भारतातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मात्र पूर्वनियोजित रुपरेषेनुसारच सुरु होईल, असा ठाम विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी व्यक्त केला. भारतातील व विदेशातील अव्वल खेळाडूंचा सहभाग असणारी व गर्भश्रीमंतीचे दालन सताड उघडून देणाऱया आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या आवृत्तीला दि. 29 मार्चपासून मुंबईत सुरुवात होणे अपेक्षित आहे.
‘आयपीएल ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सुरु होईल आणि निर्धोकपणे संपन्न होईल, याबाबत आम्हाला कोणतीही साशंकता नाही. कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असला तरी क्रिकेट रुपरेषेवर त्याचा काहीही फरक झालेला नाही. सध्याच्या घडीला देखील बऱयाच क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत. इंग्लंडचा संघ लंकेत, दक्षिण आफ्रिकेचा संघ इथे होता’, असे गांगुली म्हणाले.
कौंटी संघ पूर्ण जगभरात सर्वत्र प्रवास करत आहेत. ते अबुधाबी, संयुक्त अरब अमिरातीत खेळत आहेत, याचा त्यांनी उल्लेख केला. अर्थात, आपण कोणतीही बाब गृहित धरली नसून खेळाडू व चाहत्यांसाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना निश्चितपणाने राबवल्या जाणार आहेत, असे गांगुली यांनी नमूद केले.
‘कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवल्या जातील. सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल. या उपाययोजना नेमक्या कशा असतील, याबाबत वैद्यकीय पथक अधिक माहिती देऊ शकेल’, असे ते शेवटी म्हणाले.









