भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह संलग्न घटकांचे थेट नुकसान शक्य, जाहिरातदार, प्रायोजकांसह करारबद्ध खेळाडूंसमोरही आर्थिक नुकसानीचे संकट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जागतिक स्तरावरील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून गणले जाते. पण, यंदाची 13 व्या आवृत्तीची आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागली तर मंडळासह संलग्न घटकांचे किमान 3800 कोटी रुपयांचे नुकसान जवळपास निश्चित आहे. सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा दि. 14 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली गेली. पण, आताही ही स्पर्धा होण्याची एक टक्काही शक्यता नसून यामुळे बीसीसीआय व संलग्न घटक अर्थातच चिंतेच्या खाईत बुडाले आहेत.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार दि. 29 मार्च रोजी यंदाची आयपीएल स्पर्धा सुरु होणे अपेक्षित होते. पण, कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे प्राथमिक डागडुजी करण्याच्या दृष्टीने ती एप्रिलच्या मध्यापर्यंत लांबणीवर टाकली गेली.
दि. 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आणि तिथे बीसीसीआयच्या आयपीएल कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला. केंद्र सरकार सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन पुढेही सुरु ठेवावा का, याबाबत विचाराधीन आहे. सध्या सुरु असलेला लॉकडाऊन दि. 14 एप्रिल रोजी संपुष्टात येणे प्रस्तावित आहे. पण, असे झाले तरी आयपीएल स्पर्धा इतक्यात सुरु होणे अजिबात दृष्टिक्षेपात नाही, ही वस्तुस्थिती आहे.
उशिराने स्पर्धा खेळवणेही अशक्य
सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा आयोजित करणे महाकठीण असल्याचे ध्यानात आल्यानंतर बीसीसीआयच्या धुरिणींनी वर्षाच्या दुसऱया टप्प्यात ती भरवण्याचा विचार चालवला. पण, त्या कालावधीत देखील भरगच्च क्रिकेट सामन्यांमुळे ती शक्यताही जवळपास अंधुकच आहे. दुसरीकडे, ही स्पर्धा रद्द केल्यास लक्षावधी चाहत्यांची निराशा होणे साहजिक आहे. मंडळाला आर्थिक समीकरणांची चिंता यामुळेच घोर लावणारी ठरत आहे.
फटका किती कोटींचा?
2018 मध्ये स्टार इंडियाने 5 वर्षांचा करार करताना त्यासाठी 6138.1 कोटी रुपये मोजले होते. मात्र, त्यात भारतीय संघाचे मायदेशातील सामने व देशातील प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धांच्या प्रसारण हक्काचा समावेश होता. 2017 मध्ये स्टार इंडियाने आयपीएलचे टीव्ही व डीजिटलचे 5 वर्षांचे हक्क विकत घेतले, त्यावेळी त्यांनी तब्बल 16347 कोटी रुपये मोजले. 2018 ते 2022 या कालावधीकरिता हा करार झाला. पण, यंदाची आयपीएल स्पर्धाच होणार नसल्याने स्टार इंडियासाठी हा 3269.50 कोटी रुपयांचा थेट फटका बसणार आहे.
व्हिवोलाही 400 कोटींचे नुकसान
व्हिवो कंपनीने 5 वर्षांकरिता बीसीसीआयकडून आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप 2 हजार कोटी रुपयांना विकत घेतली आहे. त्यामुळे, यंदाची स्पर्धा न झाल्यास त्यांना देखील 400 कोटी रुपयांचा थेट तोटा होणार, हे निश्चित आहे.
स्पर्धा नाही तर मानधनही नाही
स्पर्धा नाही तर मानधनही नाही, हे प्रँचायझींचे साधेसोपे समीकरण असून यामुळे, यंदाची स्पर्धा झाली नाही तर खेळाडूंना अजिबात मानधन मिळणार नाही. गतवर्षी डिसेंबर महिन्यात 2020 मधील आवृत्तीसाठी लिलाव झाला त्यावेळी 20 ते 50 लाख रुपयांच्या बेस प्राईससह खेळाडूंचा लिलाव झाला होता. स्पर्धेत सहभागी 8 प्रँचायझींनाही प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मिळणाऱया प्रत्येकी किमान 450 ते 500 कोटी रुपयांच्या रकमेवर तुळशीपत्र ठेवावे लागेल, हे निश्चित आहे. याशिवाय, 250 कोटी रुपयांची तिकीटविक्रीची रक्कमही वसूल होणार नाही, हा आणखी एक फटका असेल.
टीम जर्सीच्या दर्शनी भागावरील जाहिरातीसाठी जाहिरातदार 18 ते 20 कोटी रुपये तर जर्सीच्या मागील बाजूवर जाहिरातीसाठी 5 ते 7 कोटी रुपये मोजतात. हेल्मेटच्या दर्शनी भागावरील जाहिरातीसाठी दीड कोटी रुपये मोजले जातात. ते सर्व प्रकारचे उत्पन्न यंदा आयपीएलच्या संलग्न घटकांसाठी वसूल करता येणार नाही, हे स्पष्ट आहे.
तर बीसीसीआयला विम्बल्डनपासून धडा शिकावा लागेल!
कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जागतिक स्तरावरील सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा एक तरी रद्द कराव्या लागल्या आहेत किंवा लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत. टेनिसमधील प्रतिष्ठेची विम्बल्डन स्पर्धा देखील रद्दबातल केली गेली आहे. पण, या स्पर्धेच्या आयोजकांनी सर्व देशभर किंवा खंडभरात थैमान घालणाऱया साथीच्या रोगाचा उल्लेख करत त्यासाठी विमा उतरवला आहे. त्यामुळे, यंदा त्यांना 141 दशलक्ष डॉलर्सची भरभक्कम रक्कम मिळणार आहे. विम्बल्डनचे आयोजक या तरतुदीसाठी मागील 17 वर्षांपासून प्रतिवर्ष 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्कम अदा करत आले आहेत. त्याचा लाभ त्यांना या वर्षी मिळणार आहे. यंदा आयपीएल स्पर्धा रद्द झाली व नुकसान भरपाई मिळू शकली नाही तर बीसीसीआयला विम्बल्डनपासून स्वतंत्र धडा शिकावा लागेल, असे सध्याचे चित्र आहे.
कोव्हिड-19 चा विमा उतरवला नसल्याने बीसीसीआयला फटका?
सध्या जी परिस्थिती उभी ठाकली, त्यात बीसीसीआय व आयपीएलचे संलग्न घटक यांना कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा रद्द झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याची तरतूदच केली गेली नसल्याने याचा त्यांना जबर किंमत मोजावी लागेल, अशी चिन्हे आहेत. चीनमधील वुहान येथून आलेला कोरोना हा विषाणू अवघ्या जगाला अशा पद्धतीने गुडघ्यावर उभे ठाकणे भाग पाडेल, याची कोणीच कल्पना केली नव्हती.
आयपीएल विमापत्रात काय म्हटले आहे?
आयपीएलच्या संघमालकांसाठी व्यावसायिक दायित्व, इव्हेंट विमा, व्यावसायिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई, अपहरण किंवा खंडणीचा प्रकार झाल्यास भरपाई, व्यवसायात व्यत्यय, वैद्यकीय व अपघाती विमा आदींची तरतूद आयपीएलने केलेल्या विमापत्रात आहे. मात्र, एखाद्या व्हायरसमुळे स्पर्धा रद्द करावी लागल्यास त्याच्या नुकसानीची भरपाई करण्याची कोणतीही तरतूद नाही, असे रजत मिश्रा म्हणाले. बीसीसीआयला याचाच फटका बसण्याची शक्यता आहे.









