नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात मागील काही आठवडय़ात कोरोनाचा झपाटय़ाने प्रादुर्भाव होत चालला असला तरी आयपीएल स्पर्धेवर काहीही परिणाम होणार नाही, ही स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल, अशी ग्वाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली. महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर गांगुली बोलत होते.
यंदा दि. 10 ते 25 एप्रिल या कालावधीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचे 10 सामने खेळवले जाणार असून दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्स या संघांचे मुंबईमध्ये अधिक वास्तव्य असणार आहे. कोलकाताचाही संघ सध्या मुंबईत आहे. पण, नंतर ते चेन्नईकडे रवाना होणार आहेत. त्यांची पहिली लढत दि. 11 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होईल.









