नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2021 मधील आयपीएल आवृत्तीसाठी दि. 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईत खेळाडूंचा लिलाव होईल, अशी घोषणा आयपीएलच्या ट्वीटर हँडलवरुन केली गेली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर हा मिनी लिलाव होईल. उभय संघातील पहिली कसोटी दि. 5 ते 9 फेब्रुवारी तर दुसरी कसोटी 13 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत खेळवली जाणार आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी यंदाचा आयपीएल हंगाम भारतातच खेळवण्याचे आपले हरसंभव प्रयत्न असतील, असे कित्येकदा म्हटले. मात्र, ही स्पर्धा भारतातच होईल, याची अद्यापही खात्री देता येणार नाही, अशी सद्यस्थिती आहे. यापूर्वी 2020 ची आयपीएल स्पर्धा कोव्हिड-19 च्या संकटामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवली गेली होती.
भारत-इंग्लंड यांच्यातील मालिका निर्विघ्न पार पडली तर आयपीएल स्पर्धा भारतात होण्यासाठी हा पहिला हिरवा कंदील असेल, असे सध्याचे संकेत आहेत. पुढील हंगामासाठी खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत मुदत होती. त्यानंतर 4 फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो सुरु असणार आहे.
स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेलसारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अनुक्रमे राजस्थान रॉयल्स व किंग्स इलेव्हन पंजाब संघांनी करारातून मुक्त केले असून ख्रिस मॉरिस, हरभजन सिंग, ऍरॉन फिंच यांनाही त्यांच्या संघांनी सोडचिठ्ठी दिली. 8 प्रँचायझींनी 139 खेळाडूंना संघात कायम केले तर 57 खेळाडूंना मुक्त केले आहे. दि. 18 फेब्रुवारी रोजी होणाऱया लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक निधी असेल. ते या मिनी लिलावासाठी 53.20 कोटी रुपये खर्च करु शकतील. आरसीबीकडे 35.90 कोटी रुपये तर राजस्थान रॉयल्सकडे 34.85 कोटी रुपयांचा निधी असणार आहे. केकेआर व सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडे सर्वात कमी प्रत्येकी 10.75 कोटी रुपयांचा निधी असणार आहे.









