प्रतिनिधी / सांगली
कोरोनाची दुसरी लाट पसरत असताना राज्य सरकारने कडक निर्बंध या राज्यात लावलेले असताना मात्र, यावर्षीचे आयपीएल हे ०९ एप्रिल पासून सुरु राहणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर देखील आयपीएल सामना होणार आहेत. राज्यात कलम १४४ लागू असून ज्यात पाचपेक्षा जास्त लोकांना एकाच ठिकाणी एकत्र जाण्यास मनाई केली असताना देखील हे सामने राज्यात कसे होत आहेत. राज्यात कोरोना नियम व कायदे हे सर्व-सामान्य गरीब जनतेवरच लादले जातात का, ‘आयपीएल” साठी कोरोना नियम लागू होत नाही का असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. कायद्याचा सोयीनुसार वापर व यातील भेदभाव सरकारने नष्ट करावा, सरकारने याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीत काही राजकीय पक्ष तसेच महाआघाडीचे नेते विनामास्क प्रचार प्रसार करत असल्याचे वृत्त प्रसारित झाले. यासोबतच पाच राज्यांच्या निवडणुकात देखील केंद्र सरकार मधील काही नेते कोरोना नियमावलीची उघडपणे पायमल्ली करताना वृत्त प्रसारित झाले आहे. यावर दंड अथवा गुन्हा दाखल केल्याचे वाचनात येत नाही. या राज्यात एकीकडे दारू सुरु आहे, आयपीएल सुरु करायचे पण हातावरचे पोट, हातगाडी, हमाल, मोल-मजूर, शेतकरी, भाजी-पाला विक्रते, गोर-गरीब जनतेवरच कोरोनाचा नियम व निर्बंध लादण्यात येत आहेत व यांचा पोटा-पाण्यावर गदा आणले गेली आहे. याचा आम्ही निषेध करतो, असे वेटम म्हणाले.