रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर प्रँचायजीला आणखी एक धक्का, देवदत्त पडिक्कल संघात परतल्याने किंचीत दिलासा
चेन्नई / वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघातील ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू डॅनिएल सॅम्स बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे आरसीबी प्रँचायजीसाठी हा आणखी एक धक्का ठरला आहे. याचवेळी सलामीवीर देवदत्त पडिक्कल मात्र यातून सावरला असल्याने हा संघासाठी किंचीत दिलासा ठरला आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा उद्यापासून (शुक्रवार दि. 9) खेळवली जाणार असून आरसीबी व विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स यांच्यातच सलामीची लढत होणार आहे.
आरसीबीने बुधवारी आपल्या ट्वीटर हँडलवर एक पत्रक जारी केले असून त्यात डॅनिएलचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे नमूद केले आहे. 28 वर्षीय डॅनिएल सॅम्स दि. 3 एप्रिल रोजी भारतात दाखल झाला आणि त्यावेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह होता. पण, दि. 7 रोजी दुसऱयांदा चाचणी घेतली गेली, त्यावेळी तो पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.
डॅनिएलने आजवर आयपीएलचे केवळ तीन सामने खेळले आहेत. मागील वर्षीच त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल पदार्पण केले होते. यंदा आरसीबीने त्याला ट्रेड केले आहे. या मोसमात देवदत्त पडिक्कलनंतर कोरोनाबाधित होणारा तो आरसीबीचा दुसरा खेळाडू ठरला. पडिक्कल मात्र कोरोनातून सावरला असून बुधवारीच तो आरसीबी संघात दाखलही झाला आहे. 20 वर्षीय पडिक्कल दि. 22 मार्चपासून क्वारन्टाईन होता. मागील हंगामात त्याने आरसीबीतर्फे सर्वाधिक धावांचा विक्रम केला. त्यावेळी त्याने 15 सामन्यात 473 धावांची आतषबाजी केली होती.
यापूर्वी, मंगळवारी मुंबई इंडियन्सचे यष्टीरक्षण सल्लागार व टॅलेंट स्काऊट किरण मोरे हे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई संघातील अन्य सर्व सदस्यांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. यंदाच्या आयपीएल स्पर्धेला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वीच अनेक झटके सोसावे लागले असून अक्षर पटेल, नितीश राणासारखे काही खेळाडू तसेच वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफ, प्रक्षेपण करणाऱया पथकातील काही सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे.









