वृत्तसंस्था/ मुंबई
सईद मुश्ताक अली करंडक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर सुखावलेल्या बीसीसीआयने आणखी दोन स्थानिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. विजय हजारे करंडक आणि महिलांसाठी वनडे स्पर्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यानंतर आयपीएलची 14 वी आवृत्ती मायदेशातच घेण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
चौदाव्या आयपीएलसाठी बीसीसीआयने वानखेडे स्टेडियम, बेबर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, रिलायन्स क्रिकेट स्टेडियम नवी मुंबई आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे स्टेडियम ही केंद्रे निश्चित केली आहेत. नूतनीकरण केलेल्या मोतेरामधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवरही यातील सामने आयोजित करण्याबाबत विचार चालू असून त्यावर बाद फेरीचे सामने खेळविले जाण्याची शक्यता आहे. या वर्षीची आयपीएल स्पर्धा एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ात सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवडय़ात संपणार आहे. 11-14 एप्रिल या दरम्यान सुरू होऊन 6 जूनच्या सुमारास ती संपणार आहे. याच कालावधीत नव्या प्रँचायजीला सामील करून घेण्यासाठी लिलावही बीसीसीआय आयोजित करणार आहे. दोन प्रँचायजींना सामील करून घेण्याची त्यांना मंजुरी मिळाली आहे, तरीही यावर्षी एकच नवा संघ सामील करून घेतला जाणार आहे.









