वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळताना आपल्याला वर्णद्वेषी टिप्पणीला सामोरे जावे लागले, असे प्रतिपादन विंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने केले आहे. या स्पर्धेत सॅमी सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळत होता.
अमेरिकेमध्ये आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईडचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जगामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी लाखो समर्थकांचा पाठिंबा मिळत आहे. आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळताना काही व्यक्तीं मला व लंकेच्या परेराला कालू असे संबोधण्यात असत. यानंतर या प्रकरणावर बरीच चर्चा घडली. वर्णद्वेष पुन्हा उरकून काढण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून होत असल्याबद्दल मी खूपच संतापलो, असे सॅमीने आपल्या स्तंभलेखामध्ये म्हटले आहे. या प्रकरणानंतर आपण आयसीसीकडे दाद मागून या सभ्य क्रीडा प्रकारात वर्णद्वेष पुन्हा डोकावत असल्याने त्याची गंभीर दखल घ्यावी, असे सुचविले. आयसीसीने या प्रकरणाची चौकशी केल्याचे समजते, असेही सॅमीने म्हटले आहे. विडींजचा माजी कर्णधार डरेन सॅमी याने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 38 कसोटी, 126 वन डे आणि 68 टी-20 सामन्यात विडींजचे प्रतिनिधित्व केले असून त्याने आपल्या नेतृत्वाखाली विडींज संघाला दोन वेळा आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून दिली आहे. 46 वषीय जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन-अमेरिकन नागरिकाचा मिनेपोलीस येथे 25 मे रोजी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.









