माफी मागितल्यानंतर बीएआयचा निर्णय, प्रणॉयला कारणे दाखवा नोटिस, समीरचे अर्जुनसाठी नामांकन
नवी दिल्ली
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने एक स्पर्धा अर्धवट सोडल्याची माफी मागितल्यानंतर भारतीय बॅडमिंटन संघटनेने त्याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे तर अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न केल्याने फेडरेशनवर टीका करणाऱया एचएस प्रणॉयला संघटनेने कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्याच्याऐवजी समीर वर्माला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.
गेल्या फेब्रुवारीत मनिलामध्ये झालेल्या आशियाई सांघिक चॅम्पियनशिपमध्ये श्रीकांत व प्रणॉय यांनी उपांत्य फेरीत भाग घेतला नव्हता. त्याऐवजी ते बार्सिलोनातील दुसऱया स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना झाले होते. भारताने त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीची लढत गमविली. मात्र स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. बेशिस्तीच्या कारणास्तव जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानावर असणारा श्रीकांत व 28 व्या स्थानावर असणारा प्रणॉय यांचे अनुक्रमे राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीएआयने नामांकन केले नव्हते. श्रीकांतने त्या कृतीबद्दल माफी मागितल्यामुळे त्याचा अर्ज क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र प्रणॉयकडे दुर्लक्ष करण्यात आले असून त्याला कारणे दाखवा नोटिसही पाठविण्यात आली आहे. त्याला बीएआयवर टीका केल्याचे उत्तर 15 दिवसांत देण्यास सांगण्यात आले आहे.
‘श्रीकांत व प्रणॉय यांनी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा अर्ध्यावरच सोडल्यामुळे त्या स्पर्धेत ऐतिहासिक पदक मिळविण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला होता. असे न करण्याची सूचना देऊनही त्यांनी स्पर्धा अर्धवट सोडली होती. के.श्रकांतने ईमेलद्वारे पाठविलेल्या पत्रात आपली चूक मान्य केली असून भविष्यात त्याची पुनरावृत्ती होणार नसल्याची हमीही त्यात त्याने दिली आहे. त्याची गुणवत्ता आणि त्याने केलेली आजवरची चमकदार कामगिरी पाहून आम्ही त्याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतला,’ असे बीएआयचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.
सलग दुसऱया वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन करण्याचे टाळल्यानंतर एसएच प्रणॉयने बीएआयवर तीव्र टीका केली होती. ‘ज्याने राष्ट्रकुल, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदके मिळविली त्याला साधे नामांकनही मिळत नाही आणि जे या स्पर्धांत खेळलेही नाहीत त्यांची मात्र शिफारस केली जाते. हा देश म्हणजे विनोद आहे,’ असे त्याने ट्विट केले होते. त्याच्या संदर्भात बोलताना सिंघानिया म्हणाले की, ‘प्रणॉयकडून अनेकदा बेशिस्त वर्तन घडले असून आतापर्यंत फेडरेशनने त्याची टीका बरीच सहन केली आहे. पण अलीकडे त्याची प्रवृत्ती बदलली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे. याशिवाय शिस्तपालन धोरणाचेही पुनरावलोकन केले जाणार आहे. त्याने जी टीका केली त्याबद्दल त्याला कारणे दाखवा नोटिस पाठविली आहे. निर्धारित वेळेत त्याने उत्तर न दिल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खेळाडू, प्रशिक्षक, तांत्रिक पदाधिकारी यांच्याबद्दलची आचारसंहिताही बनविण्यात येणार असून ती या सर्वांना बंधनकारक करण्यात येणार आहे. प्रणॉयच्या ऐवजी बीएआयने समीर वर्माची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.









