वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात अद्याप प्रचंड गुणवत्ता आहे. त्यामुळे, दर्जा व गुणवत्ता या निकषावर कोणतीही तडजोड न करता देखील आयपीएलच्या विस्ताराला भरपूर वाव आहे, असे मत माजी भारतीय कर्णधार व राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार राहुल द्रविडने मांडले आहे.
आयपीएल स्पर्धेच्या 2021 मधील पुढील हंगामात 8 ऐवजी 9 संघ असतील व 2023 पर्यंत सहभागी संघांची संख्या 10 पर्यंत पोहोचेल, असे संकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर द्रविड बोलत होता.
द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी कार्यरत असून राजस्थान रॉयल्स सहभागीदार मनोज बदालेनी देखील पुढील हंगामात 9 संघांचा सहभाग शक्य असल्याचे मत नोंदवले आहे.
नवोदितांना संधीची प्रतीक्षा
‘माझ्या मते खेळाडूंमधील गुणवत्ता पाहता, आयपीएल स्पर्धेच्या विस्ताराला भरपूर वाव आहे. अद्यापही असे असंख्य खेळाडू आहेत, ज्यांना गुणवत्ता असूनही खेळण्याची संधी मिळत नाही. हरियाणाच्या राहुल तेवातियासारखे खेळाडू आयपीएलच्या व्यासपीठामुळेच प्रकाशझोतात येऊ शकतात. टी. नटराजनचे भेदक यॉर्कर्स आयपीएलमुळेच अनुभवता आले’, असे द्रविडने येथे नमूद केले.
बदाले यांच्या ‘न्यू इनिंग्ज’ या पुस्तकाच्या व्हर्च्युअल प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी द्रविड बोलत होता.
मूळ भारतीय वंशाच्या व सध्या ब्रिटीश नागरिकत्व असलेल्या मनोज बदालेने देखील आयपीएल विस्ताराच्या संकल्पनेचे स्वागत केले. ‘2021 मध्ये 9 संघांचा सहभाग निश्चितच शक्य आहे. पण, यामुळे सामन्यांची संख्या वाढेल व दुपारच्या सत्रात आणखी सामने खेळवावे लागतील’, असे निरीक्षण त्याने नोंदवले.









