टीसीएस सर्वाधिक मजबूत : निफ्टी 11,503.35 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी दिवसभरात शेअर बाजारात आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांच्या दमदार तेजीमुळे बाजाराने उत्तम मजबूती प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 277 अंकांनी वधारुन बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या जोरावर दिवसअखेर सेन्सेक्स 276.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,973.70 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 86.40 अंकांची तेजी प्राप्त करत निर्देशांक 11,503.35 वर स्थिरावल्याची नोंद केली आहे.
सेन्सेक्समध्ये सोमवारी मुख्य कंपन्यांमध्ये टीसीएसचे समभाग सात टक्क्मयांनी तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे, यासोबतच कंपनीने 10 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासोबत देशातील दुसऱया नंबरची कंपनी म्हणून नोंद केली आहे. सोबत अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, सन फार्मा, टेक महिंदा, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनि आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला मात्र बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, बजाज ऑटो, पॉवरग्रिड आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत. हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटकडून मुंबई, दिल्लीहून लंडनला डिसेंबरला विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केल्याने समभाग तेजीत होते.
तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्याला त्यांची तब्येत काही प्रमाणात सुधारत असल्यामुळे शेअर बाजारात सुधारणा होत असल्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. याच घटनेचे पडसाद म्हणून आशियातील शेअर बाजार तेजीत होते. विदेशी चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 16 पैशांनी घसरुन 73.29 वर बंद झाला होता. याच दरम्यान बेंट क्रूड तीन टक्क्मयांनी वधारुन 40.41 डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्याची नोंद केली आहे.








