बेंगळूर
देशातील आयटी क्षेत्रातील कंपनी विप्रोचा जून तिमाहीतील नफ्याचा अहवाल सादर करण्यात आला असून कंपनीने दरम्यानच्या कालावधीत निव्वळ नफ्यात 35 टक्के इतकी वाढ दर्शवली असल्याचे दिसून आले आहे.
कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत 35 टक्के वाढीसह 3 हजार 242 कोटी रुपये नफा कमावला असून मागच्या वर्षी समान कालावधीत हा नफा 2 हजार 390 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या उत्पन्नात पहिल्या तिमाहीत 22 टक्के अधिकची भर पडली असून उत्पन्न 18 हजार 252 कोटी रुपयांवर पोहचले आहे. कंपनीला आयटी सर्व्हिसेस व्यवसायाच्या माध्यमातून अधिकचा महसूल प्राप्त होत असतो. या व्यवसायातून सप्टेंबर 2021 पर्यंत 2 हजार 535 दशलक्ष डॉलर्सहून अधिकची कमाई होण्याचा अंदाज कंपनीने वर्तवला आहे. जूनच्या तिमाहीतील नफ्याच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी नोंदवली असल्याचे दिसून आले आहे. कंपनी 5 ते 7 टक्के अधिकचा महसूल प्राप्त करणार असल्याचे म्हटले आहे.









