नव्या व बदलत्या परिस्थितीत कंपन्या युद्धपातळीवर काम करून आपापला व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासोबतच व्यवसायवाढीसाठी भरकस प्रयत्न करतानाच या कंपन्यांना आता कर्मचाऱयांच्या गळतीच्या नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ठराविक वा मर्यादित स्वरुपात कर्मचाऱयांचे नोकरी सोडून जाणे ही बाब नवी नसली तरी यावेळचे उद्योगातील व त्यातही विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचाऱयांची मोठी गळती अनेकांसाठी व विविध प्रकारे चिंतनीय ठरली आहे.
संपूर्ण संगणक तंत्रज्ञान वा आयटी क्षेत्राचा व्यावसायिक विचार करता या उद्योगांना उमेदवार-कर्मचाऱयांची नेहमीच गरज भासते. कर्मचाऱयांनी मोठय़ा प्रमाणात राजीनामा दिल्याने अभ्यासावर आधारित अंदाजानुसार सद्यस्थितीत आपल्या संगणक उद्योग सेवा क्षेत्राला सुमारे 3 लाख 50 हजार कर्मचाऱयांची आवश्यकता आहे.
यावर व्यावसायिक उपाय म्हणून आयटी कंपन्यांची कर्मचाऱयांची निवड भरती सुरू असते. सध्या तर या प्रयत्नांना विशेष गती देण्यात येत असल्याचे दिसून येते. यातील उल्लेखनीय बाब म्हणून सांगायचे झाल्यास यावषी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत टेक महिंद्र कंपनीने 15 हजार कर्मचारी नव्याने भरती केले. कंपनीने गेल्या अनेक वर्षात केवळ एका तिमाहीत एवढय़ा मोठय़ा संख्येत नव्याने कर्मचारी नेमण्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.
एप्रिल ते सप्टेंबर 2021 दरम्यान कॉग्नीझंट कंपनीने 16000 कर्मचारी नव्याने नेमले. एकत्रित स्वरुपात सांगायचे झाल्यास जुलै-सप्टेंबर या काळात संगणक-तंत्रज्ञान उद्योगातील टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल व टेक महिंद्र या प्रमुख कंपन्यांमध्ये 1, 22, 500 कर्मचाऱयांची भर पडली. कोरोनाच्या दुसऱया टप्प्याच्या नंतरच्या काळात संगणक उद्योगाची नवी व वाढती गरज पूर्ण करण्यासाठी या वाढीव कर्मचाऱयांची तेवढीच मोठी भूमिका होती.
संगणक सेवा- उद्योग क्षेत्रात कर्मचाऱयांची मोठय़ा प्रमाणावर निवड करणाऱया आघाडीच्या सल्लागार कंपन्यांनुसार या क्षेत्राला मार्च 21 पर्यंत म्हणजेच पुढील सुमारे 3 महिन्यांमध्ये सुमारे 20 हजार नव्या कर्मचाऱयांची गरज निश्चितपणे भासणार आहे. अधिक तपशीलासह सांगायचे म्हणजे प्रमुख व्यवस्थापन सल्लागार कंपनी अर्न्स्ट अँड यंग नुसार त्यांची कंपनी संगणक इंजिनिअर स्तरावर 6000 उमेदवारांची तर अन्य प्रमुख व्यवस्थापन सल्लागार कंपनी प्राईस वॉटर कूपर कंपनीतर्फे 3000 इंजिनिअर्सची नव्याने भरती करणार आहे. आयटी क्षेत्रात नव्याने दाखल होणारे हे इंजिनिअर्स संगणक शास्त्र व तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित व अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे उद्योग-व्यवसाय विषयक माहिती व तपशिलाचे संकलन, विश्लेषण, संगणकीय सुरक्षा, आर्थिक व्यवहार व त्यासंदर्भात सल्ला मार्गदर्शन देण्याचे काम करणार आहेत.
बेंगळूर येथील मार्केंटिंग सल्लागार कंपनी ‘अनअर्थ इनसाइटस्’ नुसार आगामी वषी म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षात संगणकशास्त्र व सेवा क्षेत्रात सुमारे 4,50,000 कर्मचाऱयांची गरज भासणार आहे. या मध्ये व्यवस्थापक, इंजिनिअर्स, तंत्रज्ञांपासून सेवा विषयक काम करणाऱया विविध स्तरांवरील कर्मचाऱयांचा समावेश अपेक्षित आहे.
उद्योग- व्यवसायाची वाढ होत असतांनाच संगणक तंत्रज्ञान उद्योगाला कर्मचाऱयांच्या गळतीने नव्याने घेरल्याचे दिसून येते. या संदर्भात पडताळय़ासह अभ्यास केल्यास लक्षात येते की, व्यवसायात मंदी प्रगती या दोन्ही वेळा संगणक उद्योग क्षेत्रात कर्मचाऱयांची गळती ही होतेच. यातच भर पडते ती या क्षेत्रात होणारे तंत्रज्ञानविषयक बदल आणि व्यवसायवाढ. मात्र या साऱयांचा परिणाम व परिणती होते ती कर्मचाऱयांच्या गळतीमध्ये.
टीसीएस कंपनीच्या पूर्व परंपरेनुसार कंपनीने पूर्वकाळात कर्मचाऱयांचे नोकरी सोडून जाणे प्रसंगी मोठय़ा प्रमाणात बघितले आहे. यातून काही प्रश्न उभे ठाकले. समस्यांना सामोरे जावे लागले. काही प्रमाणात व्यवसायावर परिणाम झाला. या साऱया आणि समस्यांना टीसीएस कंपनीचे व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांनी यशस्वीपणे मात केली. कर्मचाऱयांशी संबंधित विविध प्रश्न आणि मुद्यांसह त्यांच्या समस्या व आशा अपेक्षांचा अभ्यास केला, त्यानुसार उपाय-योजनांची अंमलबजावणी केली व त्यातून टीसीएसमधील कर्मचाऱयांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण कमी कसे होईल. यासाठी सातत्याने व विविध प्रकारे प्रयत्न केले. परिणामी टीसीएसमधील कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण नियंत्रितच नव्हे तर सर्वात कमी राहिले. आजही ही परंपरा कायम ठेवत सध्याच्या अस्थिर व आव्हानपर स्थितीतही टीसीएसमधील कर्मचाऱयांची गळती संगणक उद्योग क्षेत्रातील इतर व तुलनात्मक कंपन्यांच्या तुलनेत सर्वात कमी राहिले आहे हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे.
गेल्या काही वर्षातील व्यावसायिक स्थिती व विशेषतः कोरोनानंतरची उद्योगांमध्ये झालेली मोठी उलथापालथ यामुळे विविध आयटी कंपन्यांनी आपल्या व्यावसायिक धोरणांमध्ये मोठे आणि मुलभूत बदल केल्याचे दिसून येते. टेक महिंद्रा कंपनीने यासंदर्भात दोन प्रकारे काम केले आहे. एकीकडे या आणि अशा आव्हानपर व अस्थिर व्यावसायिक परिस्थितीत सुद्धा टेक महिंद्रा कंपनीने अमेरिकेतील दोन प्रमुख संगणक कंपन्यांचे अधिग्रहण करून मोठे धाडसाचे काम केले.
याशिवाय कोरोनानंतरच्या नव्या स्थितीवर अधिक परिणामकारक व प्रभावी उपाययोजना म्हणून पूर्वापार स्वरुपात मोठय़ा व महानगरांमधील कार्यालयांमधूनच काम करण्याऐवजी विविध राज्यातील छोटय़ा शहरांमधून काम करण्यास प्राधान्य दिले. याच्याच जोडीला टेक महिंद्रा कंपनीने मध्यम स्वरुपातील शहरांमधून उमेदवार निवडण्यावर जोर दिला. यामुळे कंपनीतील कर्मचाऱयांच्या नोकरी सोडून जाण्याच्या प्रमाणात कमी येऊ शकली.
तसे पाहता संगणक उद्योग क्षेत्रात कर्मचाऱयांची मोठय़ा प्रमाणावरील गळती यापूर्वीदेखील दिसून आली. यामध्ये प्रामुख्याने वाय टू के, डॉट कॉम नंतरची स्थिती, लेहमन ब्रदर्सच्या निमित्ताने निर्माण झालेले संकट या साऱया प्रसंगी संगणक क्षेत्रातून फार मोठय़ा संख्येत व प्रमाणात कर्मचाऱयांची गळती झाली होती.
तसे पाहता व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकारांच्या मते उद्योग-व्यवसाय क्षेत्रात कर्मचाऱयांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण सर्वच उद्योग क्षेत्राला लागू असते. हीच बाब संगणक उद्योगाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास या क्षेत्रात कर्मचाऱयांचे सोडून जाण्याचे प्रमाण नेहमीच इतर क्षेत्रांपेक्षा अधिक राहिले आहे व ही एक सहज प्रक्रिया आहे. जाणकारांच्या मते संगणक क्षेत्रातील कर्मचारी गळतीचे वाढते प्रमाण या उद्योगाच्या ठोस प्रगतीचे प्रतीक सिद्ध झाले असून कोरोनानंतरच्या प्रगतीचे प्रतिनिधिक स्वरुप म्हणूनच या प्रकाराकडे आशादायी स्वरुपात पहायला हवे.
-दत्तात्रय आंबुलकर









