सेन्सेक्स 300 पेक्षा अधिक तर निफ्टी 95.70 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई शेअर बाजारातील भांडवली बाजारात गुरुवारी दिवसअखेर सेन्सेक्सने 300 पेक्षा अधिक अंकांनी मजबूत होत 40,000 चा विक्रमी टप्पा पार केला आहे. सदरची कामगिरी करण्यासाठी आयटी कंपन्यांच्या समभागातील लिलावाचा लाभ बाजाराला झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्सने 400 अंकांचा उच्चांकही पार केला होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 303.72 अंकांनी वधारुन निर्देशांक 40,182.67 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 95.75 अंकांनी मजबूत होत 11,834.60 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या नफा कमाईमुळे अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, एचसीएल टेक इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा यांचे समभाग सर्वाधिक लाभात राहिले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या 3,000 रुपये प्रति इक्विटी भावावर 16,000 कोटी रुपये मूल्याच्या पुर्नखरेदी योजनेची घोषणा करण्यात आल्याने कंपनीचे समभाग हे तब्बल 3 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये ओएनजीसी, आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्टस आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत. निफ्टीत एफएमसीजी आणि मीडिया क्षेत्रातल्या कंपन्या नुकसानीत होत्या. इतर क्षेत्रातल्या कंपन्यानी मात्र नफा करून घेतला. ऑटो, बँक, सार्वजनिक बँक, रियॅल्टी, वित्तसेवा, खासगी बँक, धातू आणि माध्यम क्षेत्रातल्या कंपन्या नफ्यासह कामगिरी करत होत्या. जागतिक पातळीवर आशियातील अन्य बाजारात मात्र चीनचा शांघाय, दक्षिण कोरियातील सोल आणि जपानचा टोकीओमधील बाजार तेजीत राहिले होते. तर युरोपमधील प्रमुख बाजार प्रारंभीच्या काळात तेजीत होते. आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूडचा भाव 1.62 टक्क्मयांनी मजबूत होत 42.67 डॉलर प्रति बॅरेल झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी मजबूत होत 73.24 वर स्थिरावला आहे.








