प्रतिनिधी/ पणजी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशासाठी नोंदणी करण्याच्या मुदतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता 15 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत. मात्र यातील इलेक्ट्रिशीयन, वायरमन आणि फिटर या अभ्यासक्रमांसाठी 100 टक्के विद्यार्थी नोंदणी झालेली आहे.
राज्यातील सर्व आयटीआयमध्ये मिळून एकूण 37 तांत्रिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत. त्यांची एकूण विद्यार्थी क्षमता 3884 एवढी आहे. मात्र आतापर्यंत सुमारे 50 ते 55 टक्के एवढय़ाच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गेल्या 26 ऑक्टोबरपासून आयटीआयमध्ये प्रशिक्षण प्रारंभही करण्यात आले होते. परंतु केंद्राने नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केल्यामुळे सुमारे आठवडाभरानंतर हे अभ्यासक्रम बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱया विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येणार असून 23 नोव्हेंबरपासून आयटीआयमध्ये नियमित प्रशिक्षण प्रारंभ होणार आहे. विद्यमान अभ्यासक्रमांपैकी ब्युटिशियन यासारखे काही अभ्यासक्रम हे केवळ महिलांसाठी आहेत. अपवादात्मक वगळता उर्वरित सर्व अभ्यासक्रमात महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
राज्यात एकूण 11 सरकारी व तीन खाजगी आयटीआय आहेत. सांखळी, शिवोली व खोर्ली येथे खाजगी आयटीआय संस्था आहेत.









