रोजगाराची हमी असल्याने वाढला कल, 31 ऑगस्टपर्यंत करता येणार नाव नोंदणी
प्रतिनिधी /बेळगाव
रोजगाराच्या संधी लवकर उपलब्ध होत असल्याने आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. फिटर, इलेक्ट्रिशीयन, टर्नर या टेडकरता सर्वाधिक पसंती मिळत आहे. दहावी झाल्यानंतर दोन वर्षे आयटीआय पूर्ण केल्यानंतर बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रात लगेच नोकरी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे वाढत आहे. मंगळवार दि. 31 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना आयटीआयसाठी ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे.
कोरोनामुळे शिक्षणाची देखील अनेक समिकरणे बदलली. मागील दीड वर्षात ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली. दहावी नंतर दोन वर्षे पीयूसी पूर्ण करूनही विद्यार्थ्यांच्या हाती कोणतेच कौशल्य नसल्याने पुन्हा त्यांना पुढील शिक्षणावर अवलंबून रहावे लागत होते. ज्यांची पुढे शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही असे विद्यार्थी पीयूसी नंतर शिक्षण सोडून इतरत्र कामाला जात आहेत. त्यामुळे नोकरीची हमी असल्याने आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे.
बेळगावमध्ये उद्यमबाग, मच्छे, अनगोळ, नावगे, मजगाव, काकती, होनगा, या परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामुळे दररोज हजारो कामगारांची गरज भासते. आयटीआयद्वारे कौशल्य प्राप्त कामगार मिळत असल्याने उद्योजक देखील आयटीआय उत्तीर्णांना नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देतात. यामुळे आयटीआय कडील ओढा दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे.
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आधारकार्ड, दहावीचे गुणपत्रक, मोबाईल क्रमांक, इ मेल आयडी, जात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फोटो, बँक पासबूक ही सर्व कागदपत्रे घेऊन प्रवेश घ्यायचा आहे. प्रवेशासाठी अवघे कांही दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
मजगाव येथील आयटीआय कॉलेजमध्ये फिटर, इलेक्ट्रिशीयन, टर्नर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, इन्स्ट्रूमेंटल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक व्हेईकल, ड्राफ्टमन, डिझेल मेकॅनिक, वेल्डर, फौंड्रीमन यासह इतर टेड उपलब्ध आहेत. इच्छुकांनी www.detkarnataka.org.in किंवा www.emptrg.kar.nic.in यावर नाव नोंदणी करावयाची आहे.









