सीएएविरोधी आंदोलनात सहभागाचा संशय : दिल्लीत मोठा हल्ला घडवण्याचा होता कट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी आयएसशी संबंधित दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोघांनाही दिल्लीच्या ओखला भागातून अटक करण्यात आली आहे. हे दोघे पती-पत्नी असल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यांचा दिल्लीतील सीएएविरोधी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अटक करण्यात आलेल्यांमधील पतीचे नाव शहानजेब सामी आणि पत्नीचे नाव हिंदा बशीर बेग असे आहे. दोघांकडून संवेदनशील साहित्यही जप्त करण्यात आले आहे. दोन्ही संशयित पती-पत्नी दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दिल्लीतील ओखला भागातील जामियानगरमधून दिल्ली पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे जोडपे सीएएविरोधात निदर्शनेही करीत होते. त्यानुसार आता सीएएविरोधात निदर्शनेही आयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत का? हा प्रश्न दिल्ली पोलिसांच्या ताज्या कारवाईने उपस्थित केला जात आहे. सदर जोडप्याने सीएएविरोधात निषेध व्यक्त केला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्यावतीने पोलीस उपायुक्त (डीसीपी) प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिली.









