81 जखमी, हल्लेखोर चकमकीत ठार
वृत्तसंस्था/ काबूल
दोघा दहशतवाद्यांनी केलेल्या केलेल्या अंदाधूंद गोळीबारात 32 जण ठार तर 81 गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन्ही हल्लेखोर ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यातून अफगाणिस्तानचे विरोधी पक्षनेते अब्दुल्ला हे थोडक्यात बचावले. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (आयएस) जबाबदारी स्वीकारली आहे.
अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याक शिया समुदायावर ‘आयएस’कडून हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी काबूलनजीक असणाऱया दस्ता-ए-बारची येथे शिया समुदायाचा कार्यक्रम सुरू होता. अफगाणिस्तानमधील शांती परिषदेचे प्रमुख करिम खालिली यांचे भाषण सुरू होते. त्यांना बोलताना हल्लेखोर दहशतवाद्यांनी थांबवले. यानंतर त्यांच्यासह उपस्थितांवर अंदाधूंद गोळीबार केला. त्यानंतर कार्यक्रमस्थळी खळबळ माजली. नागरिक पळू लागल्याने एकच गोंधळ उडाला. हल्ल्यात 32 जण ठार तर 81 नागरिक जखमी झाले. गोळीबारानंतर बांधकाम सुरू असणाऱया एका इमारतीमध्ये हल्लेखोर लपले. सुमारे पाच तासाच्या चकमकीनंतर दोघांनी ठार मारण्यात सुरक्षा दलास यश आले, अशी माहिती अफगाणचे परराष्ट्र मंत्री नसरत रहिमी यांनी दिली. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अब्दुल्ला उपस्थित होते; पण कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यानंतर काही मिनिटांमध्येच हल्ला झाल्याने ते बचावले. काबूलमध्ये मागील वर्षी ‘आयएस’ने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शिया समुदायाचे 63 नागरिक ठार झाले होते.









