वृत्तसंस्था/ मुंबई
कोलकाता येथील फुटबॉल क्षेत्रात अव्वल समजला जाणारा इस्ट बंगाल फुटबॉल क्लब 2020 च्या इंडियन सुपर लीग स्पर्धेत आपले पदार्पण करणार असल्याची घोषणा स्पर्धा आयोजकांनी रविवारी केली.
भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये सुमारे 100 वर्षांचा इतिहास लाभलेल्या इस्ट बंगाल फुटबॉल क्लबला पुन्हा नव्याने फुटबॉलच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न चालू होते. आता इस्ट बंगाल फुटबाल क्लबला कोलकाताच्या श्री सिमेंट उद्योग समुहाने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर इस्ट बंगाल फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग स्पर्धेत आपले पदार्पण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सादर केली. आता या क्लबला श्री सिमेंट इस्ट बंगाल फौंडेशन अशा नव्या नावाने ओळखले जाईल. 2020 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणारा इस्ट बंगाल फुटबॉल क्लब हा अकरावा संघ आहे. कोरोना महामारीमुळे सदर स्पर्धा यावर्षी गोव्यातील तीन ठिकाणी होणार आहे. इंडियन सुपर लीग आयोजकांनी इस्ट बंगालचे स्वागत केले आहे. कोलकात्याचा मोहन बगान संघामध्ये एटीकेचे विलीनीकरण झाले असल्याने आता बगान-एटीके असे या क्लबचे नवे नामकरण करण्यात आले आहे. देशामध्ये फुटबॉलचा अधिक विकास करण्यासाठी पश्चिम बंगाल संघाकडून प्रयत्न केले जात आहे.









