बेळगाव
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) बेळगाव शाखेचा पदग्रहण समारंभ रविवारी पार पडला. आयएमएच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. अनिल पाटील यांची तर सेक्रेटरीपदी डॉ. देवेगौडा यांची निवड करण्यात आली आहे.
आयएमचे मावळते अध्यक्ष डॉ. मिलींद हलगेकर यांच्या हस्ते डॉ. अनिल पाटील यांनी तर मावळते सेक्रेटरी डॉ. सूरज जोशी यांच्या हस्ते डॉ. देवेगौडा यांनी सूत्रे स्वीकारली. यावेळी बोलताना डॉ. अनिल पाटील म्हणाले की, डॉक्टरांसाठी सीएमई कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अलिकडच्या काळात डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी खबरदारी घेण्याची गरज असून रुग्णांवर उपचार करताना सतर्क रहावे.
आयएमए अध्यक्ष अनिल पाटील यांचे प्राथमिक शिक्षण विजापुरात झाले. माध्यमिक शिक्षण सेंट पॉल्स हायस्कूल (बेळगाव) येथे झाले. तर जे. एन. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस व एमएस ऑर्थोची पदवी घेतली. त्यांनी बेंगळूर येथील सेंट जोन मेडिकल कॉलेज येथे सेवा बजावली आहे. त्यांनी या क्षेत्रात सुमारे 20 वर्षे सेवा केली आहे. ते लेक व्हय़ू हॉस्पिटल येथे मुख्य सल्लागार म्हणून काम पहात आहेत. ते बेळगाव आर्थोपेडिक सर्जन असोसिएशन सोसायटीचे अध्यक्ष होते. तसेच कर्नाटक आर्थोस्कोपिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते.
देवेगौडा हे ऑर्थोपेडीक सर्जन असून श्री आर्थो ऍन्ड ट्रामा सेंटरचे संचालक आहेत. तसेच त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी घनिष्ठ संबंध आहे. गरजू रुग्णांना देवेगौडा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत मदत केली जाते. तसेच मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते.









