माझगाव डॉकयार्डमध्ये निर्मिती – युद्धनौकेवरून ब्रह्मोस, बराक मिसाईल सोडणे शक्य
प्रतिनिधी/ मुंबई
भारताची ताकद वाढणारी संपूर्ण स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस विशाखापट्टणम’ ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत माझगाव डॉककडून ती नौदलाकडे सुपूर्त करण्यात आली. या युद्धनौकेवरून ब्रह्मोस आणि बराक यासारखी मिसाईल सोडणे शक्य होणार आहे. या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर 249-ए स्टीलचा वापर करून केली आहे. भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका आहे.
स्वदेशी ‘स्टेल्थ मिसाईल डेस्ट्रोयर’ अशी ‘आयएनएस विशाखापट्टणम’ची ओळख आहे. ही युद्धनौका मुंबईनजिकच्या माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली असून त्याची लांबी 163 मीटर आणि वज 7 हजार 400 टन इतके आहे. या युद्धनौकेवर क्षेपणास्त्रे, ब्रह्मोस, टोरपीडो टय़ूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लाँचर, बीएचईएलची 76 एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे आहेत. सध्या भारतीय नौदलात 130 युद्धनौका आहेत.
‘आयएनएस विशाखापट्टणम’ युद्धनौका नौदलाच्या प्रोजेक्ट 15-बी चा एक भाग असणार आहे. त्याअंतर्गत चार युद्धनौका तयार करण्यात येणार आहेत. यातील तीन मोरमुगाओ, इम्फाल आणि सूरतला तयार होणार आहेत. आयएएनएस मोरमुगाओ 2023 पर्यंत, इम्फाल 2024 पर्यंत आणि आयएनएस सूरत 2025 पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत आपली समुद्रातील ताकद वाढवत आहे.
निर्मितीसाठीचे 75 टक्के साहित्य स्वदेशी
‘आयएनएस विशाखापट्टणम’ 75 टक्के स्वदेशी साहित्य वापरून तयार करण्यात आली आहे. पफष्ठभागावरून पफष्ठभागावर आणि पफष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम आणि लघु पल्ल्याच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेट्स, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र प्रणालीचा यात समावेश आहे. अतिशय ताकदवान कम्बाईन्ड गॅस आणि गॅस प्रॉपल्शन प्रणालीवर पाणी कापत वेगाने जाणारी ही युद्धनौका 30 नॉटिकल मैलापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकते. आपली मारक क्षमता आणखी वाढवण्यासाठी या विनाशिकेवर दोन एकात्मिक हेलिकॉप्टर्सही तैनात करता येतात. अतिशय उच्च दर्जाची स्वयंचलित यंत्रणा आणि अत्याधुनिक डिजिटल नेटवर्क, कॉम्बॅट मॅनेजमेंट प्रणाली आणि इंटेगेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट प्रणालीचा वापर या युद्धनौकेत करण्यात आला आहे.
‘आयएनएस वेला’ पाणबुडी 25 नोव्हेंबरला नौदलात
‘आयएनएस विशाखापट्टणम’ युद्धनौकेपाठोपाठ येत्या चार दिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी स्कोर्पीन क्लासची चौथी पाणबुडी ‘आयएनएस वेला’ही भारताची समुद्रातील ताकद वाढवणार आहे. 25 तारखेला आयएनएस वेला नौदलात दाखल होणार आहे. या कार्यक्रमाला नौदलाचे प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रोजेक्ट-75 अंतर्गत सहा पाणबुडय़ांची बांधणी करण्यात येत आहे. नौदलाच्या ताफ्यात ‘वेला’च्या समावेशामुळे या प्रकल्पातील निम्मा टप्पा पूर्ण होणार आहे. या पाणबुडय़ांची बांधणीही मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेड (एमडीएल) येथे करण्यात येत आहे. फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुडय़ांच्या धर्तीवर त्या बांधण्यात येत आहेत. ही पाणबुडी वेस्टर्न नेव्हल कमांडच्या पाणबुडय़ांच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. वेला ही चौथी पाणबुडी असून या पाणबुडीच्या बहुतेक सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लढाईसाठी ती सज्ज असून कोणत्याही मोहिमेमध्ये ती सहभागी होऊ शकते.









