पंजशीर: पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. पण याआधी अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी हा दावा फेटाळून लावला होता. पण तालिबानी पंजशीर प्रांतावर ताबा मिळविल्याचे ठामपणाने सांगत आहेत. पंजशीरमध्ये तालिबानविरोधी दले तालिबानी सैन्याला प्रतिकार करत होती. पण अखेर तालिबानने त्यांचा पराभव करून पंजशीरमधील आठ जिल्हे ताब्यात घेतल्याचे म्हटले जात आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सोमवारी पंजशीरवर नियंत्रण मिळवल्याची माहिती दिली होती. मात्र तालिबानने पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला असला तरी अहमद मसूद यांनी तो नाकारला आहे. तालिबानविरुद्ध युद्ध चालू ठेवणार असल्याचे मसूद यांनी म्हटले आहे.
“आम्ही अजिंक्य आहोत आणि आमचे सैनिक तालिबानशी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढतील. मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तालिबानशी लढत राहीन,”असे अहमद मसूदने म्हटले आहे. तालिबानने पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा केल्याच्या काही तासांनंतर अहमद मसूदचे हे वक्तव्य समोर आले आहे.फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका ऑडिओ मेसेजमध्ये मसूदने हे वक्तव्य केलं आहे. आमचे सैन्य अजूनही पंजशीरमध्ये आहे आणि तालिबानविरुद्ध युद्ध सुरू आहे असे मसूदने म्हटले आहे. याशिवाय त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना तालिबानविरुद्धच्या युद्धात एकत्र येण्याचे आवाहनही केले. तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह आणि तालिबानविरोधक अहमद शहा मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करीत होते.
पंजशीरमधील तालिबानच्या चौक्यांवर एअर स्ट्राईक
दरम्यान, आजवर अजिंक्य असलेला पंजशीर प्रांत ताब्यात घेतल्याचा दावा काल तालिबानने केला. मात्र, मध्यरात्री अज्ञात लढाऊ विमानांनी पंजशीरमधील 5 तालिबानी चौक्यांवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये अनेक तालिबानी दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त तेथील स्थानिक मीडियाने दिले आहे.
Previous Articleबीए भाग-2 च्या विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर
Next Article हसन अखुंड होणार अफगाणिस्तानचे पंतप्रधान?









