एनआरपी, एनपीआर, सीएएविरोधात जोरदार घोषणा : प्रांतांना निवेदन
प्रतिनिधी / सावंतवाडी:
एन. आर. सी., एन. पी. आर. आणि सी. ए. ए. कायद्याविरोधात ‘आम्ही भारतीय संघटने’च्यावतीने सावंतवाडीत बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कॉम्रेड अजित अभ्यंकर यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. पालिकेचे इंदिरा गांधी संकुल, बाजारपेठ ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
‘एन. आर. सी. से आझादी, एन. पी. आर. से आझादी, सी. ए. ए. से आझादी’ अशा विविध घोषणा देत मोर्चेकऱयांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चात मोठय़ा संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या. सावंतवाडीत या कायद्याच्या विरोधात प्रथमच मोठय़ा प्रमाणात विरोध दिसून आला. मोर्चात मुस्लिम, ख्रिश्चन बांधवाची उपस्थित लक्षणीय होती.
मोर्चात राष्ट्र सेवादलाचे कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, माजी नगराध्यक्ष अनारोजिन लोबो, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सर्फराज नाईक, सावंतवाडी मुस्लिम वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक मेनन, ज्येष्ठ विचारवंत अल्ताफ खान, ऍन्थोनी डिसोजा, अन्वर खान, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव, माजी नगरसेवक तानाजी वराडकर, अफरोज राजगुरु, नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर, बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी, किशोर वरक, कुडाळचे नगरसेवक इजाज नाईक, तौकिर शेख, जिकर मेनन, हिदायत्तुल्ला खान, प्रा. विनोदसिंह पाटील, समीर बेग, बाबल्या दुभाषी, शब्बीर मणियार, खलिद, रमेश बोंद्रे, मोहन जाधव, सुरज खान, ऑगोस्तिन डिसोझा आदी सहभागी झाले होते.
प्रस्तावित कायद्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या मोर्चात मोर्चेकऱयांच्या हातात विविध फलक झळकत होते. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर तेथील परिसरही मोर्चेकऱयांनी घोषणांनी दणाणून सोडला. त्यानंतर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात कायद्यात फेरविचार करून परदेशी पीडित नागरिकांना त्यांचा देश, धर्म, जात, वंश भेदभाव न करता मानवतावादी दृष्टिकोनातून नागरिकत्त्व देण्यासंबधी कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी मोर्चाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली. या कायद्याला असलेल्या विरोधामागची भूमिका या निवेदनात सविस्तर स्पष्ट करण्यात आली.









