ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूशी लढताना जगभरात व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत आहे. त्याच पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी दोन अटींवर एफडीएने मंजूर केलेल्या व्हेंटिलेटर्सचा जगभरात मोफत पुरवठा करण्यास आपली कंपनी तयार असल्याचे एका ट्विटद्वारे म्हटले आहे.
इलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना विषाणूशी लढताना जगभरात व्हेंटिलेटर्सची कमी जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच देशांनी व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीला गती दिली आहे. पण ते लगेच तयार करणे शक्य नाही. एफडीएने मंजुरी दिलेली अतिरिक्त व्हेंटिलेटर्स आमच्याकडे आहेत. टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील हॉस्पिटल्समध्ये आम्ही ती व्हेंटिलेटर्स पोहचविण्यास तयार आहोत. व्हेंटिलेटर व त्याच्या वाहतुकीसाठी एकही पैसा आकारणार नाही. पण त्यासाठी आमच्या दोन अटी आहेत, एक म्हणजे तुम्हाला त्या व्हेंटिलेटरची तात्काळ आवश्यकता असली पाहिजे. दुसरी अट म्हणजे तुम्ही ती व्हेंटिलेटर्स गोदामात ठेवायची नाहीत, असे मस्क यांनी त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.









