चन्नम्मा चौकात निदर्शने, भाजपच्या मोर्चाला प्रत्युत्तर : बदनामीचे कारस्थान त्वरित थांबवा
प्रतिनिधी /बेळगाव
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपने मोर्चा काढल्यानंतर सतीश जारकीहोळी यांच्या समर्थकांनीही सोमवारी शक्तीप्रदर्शन केले. कित्तूर चन्नम्मा चौक येथे जोरदार घोषणाबाजी करत आपली ताकद दाखवून दिली. आमदार सतीश जारकीहोळी यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरविली जात आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आपले शक्तिप्रदर्शन करून त्याचा निषेध नोंदविला आहे.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी कित्तूर चन्नम्मा चौक येथे तब्बल तीन तास रास्तारोको केला. यावेळी अनेकांनी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनात भाषण केले. वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष राजेश तळवार म्हणाले, आमदार सतीश जारकीहोळी यांना बदनाम करत असाल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपच्या आमदारांवर टीकास्त्र सोडले.
आमदार सतीश जारकीहोळी यांनी कधीच जातीभेद, भाषाभेद दाखविला नाही. जगद्गुरू बसवेश्वर, वाल्मिकी, छत्रपती शिवाजी महाराज, संगोळ्ळी रायण्णा, राणी कित्तूर चन्नम्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह इतर महापुरुषांचा आदर करतच त्यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे. मात्र चुकीची माहिती पसरवून त्यांना बदनाम करत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. बदनामी करणाऱयांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यावेळी म्हणाले, आमदार सतीश जारकीहोळी यांच्यावर टीका करण्याचा कोणालाच अधिकार नाही. कारण त्यांनी कधीच जातीभेद केला नाही. तेव्हा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न थांबवावा, असा सज्जड इशारा दिला आहे. याचबरोबर भाऊ गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाजपच्या आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सतीश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी कित्तूर चन्नम्मा चौकात जोरदार घोषणाबाजी करत तसेच प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला. तब्बल तीन तासांहून अधिक वेळ रास्तारोको तसेच भाषणे झाली. यावेळी मोठय़ा संख्येने समर्थक उपस्थित होते.









