प्रतिनिधी / सातारा
राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतो ना कोणाचा शत्रू. त्याचाच प्रत्यय नुकताच साताऱयानजिकच्या वाढे येथील शिवम लॉनमध्ये सातारकरांना अनुभवायला आला. गत आठवडयात एकमेकांची उणीदुणी काढत पाण्यात बघायला निघालेले दोन आमदार चक्क मांडीला मांडी लावून चांगल्या गप्पांचा फड रंगला होता. मात्र, त्यांच्या या गप्पाकडे मीडियाच्या नजरा जाताच दोघे सावध झाले. या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांचीही हजेरी होती.
राजकारणात कधी काही होईल हे सांगता येत नाही. सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रराजे यांनी गेल्या आठवडय़ात जावलीतील कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात काटयाने काटा काढतो, आपण कोणाला सोडत नाही, असे आक्रमक वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. आमदार शशिकांत शिंदे यांच्या दिशेने रोख त्यांचा होता. त्यांच्या या वक्तव्याला आमदार शिंदे यांनीही प्रत्युउत्तर दिले. तर आता त्यात भरीस भर आमदार नरेंद्र पाटील यांनी एका ठिकाणी बोलताना आमदार शिवेंद्रराजेंना सल्ला देत शशिकांत शिंदे यांच्यावर टीप्पणी केल्याने वातावरण एका वेगळ्य़ा वळणावर आले आहे.
असे असतानाच आज मेढय़ातून सुरु झालेले रण अखेर वाढे नजिक असलेल्या देविका लॉणवर एक साखरपुडयाच्या सोहळय़ाला अगोदर शिवेंद्रराजेंनी हजेरी लावली. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे हे आले अन् त्यांच्या शेजारी बसले. दोघांच्या छान गप्पा सुरु झाल्या. गप्पांचा फड सुरु असतानाच अचानक त्यांचे समोर सुरु असलेल्या कॅमेऱयाकडे लक्ष गेले अन् दोघे तुटाक झाले. कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनीही हजेरी लावली. श्रीनिवास पाटील यांच्यासोबतही फोटो दोघांनी काढले. त्या दोघांच्या भेटीबाबत आमदार शशिकांत शिंदे यांना छेडले असता ते म्हणाले, आम्ही दोघांनी भेटायचे नाही का?, असा प्रतिप्रश्न करत बाहेर पडले.