भोंदवडे येथे झाला राष्ट्रवादीचा मेळावा : परळी खोरे राष्ट्रवादीमय करण्याचे आवाहन
वार्ताहर/परळी
सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक शशिकांत वाईकर यांनी काल, रविवारी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या मेळाव्यापूर्वी जोरदार पत्रकबाजी व आरोप, प्रत्यारोप झाल्याने मेळावा कसा होणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहिले होते. मात्र, मोठे शक्ती प्रदर्शन करत भोंदवडे येथे हा प्रवेश मेळावा झाला. प्रारंभी मान्यवरांच्या स्वागतानंतर शशिकांत वाईकर यांच्यासह महत्वाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करुन राष्ट्रवादीत स्वागत करण्यात आले.
या मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रवक्ते व आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे तसेच परळी खोऱयातील अजितदादा फौजी, विष्णू पवार, श्रीरंग देठे, भानुदास निकम, प्रदीप माने, विनोद सावंत, हौसाराम शिंदे, विनोद मनवे, मोहन धोंडवड, सुनील पिंपळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, आमच्यासारख्याचा अपवाद वगळला तर राज्यात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले. राज्यातील सत्तेची गणिते आमचे शरद पवार यांनी बांधली आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा जन्म झाला. मात्र यामुळे विरोधकांची स्वप्ने भंग झाली. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोरोना संसर्गाला यशस्वीपणे तोंड देत असतानाच विकासाची अनेक कामे मार्गी लावण्यात राज्य शासन यशस्वी ठरले आहे.
भाजपकडून फक्त विरोधासाठी विरोध केला जात आहे. तर केंद्रातील भाजप सरकार विरोध करणाऱयांच्या पाठीमागे इडीची चौकशी लावून सूडबुध्दीचे राजकारण खेळत असल्याचा आरोप करुन आमदार शिंदे पुढे म्हणाले, सत्तेचा वापर चुकीचा होतो हे छगन भुजबळ यांच्यावरून दिसून येत शेवटी सत्याचा विजय झाला. सध्या शेजारची छोटी राष्ट्रे देतील आपल्या देशाला आव्हान देत असताना एक देश विकतो आहे. त्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याची भाषा केलीय मात्र राष्ट्रवादीचे सैन्य त्यांना पुरुन उरेल.
यावेळी शशिकांत वाईकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांना बरोबर घेवून जाणारा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा निर्णय परळी खोऱयातील विविध गावाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर घेतला आहे.
आता जावली, परळी खोऱ्यात चमत्कार घडवा
महाराष्ट्राने कधीही जातीयवादीला थारा दिला नाही. सर्वांना बरोबर घेवून जात असल्यामुळेच साताऱयात झालेल्या शरद पवारांच्या सभेने चमत्कार झाला आणि श्रीनिवास पाटील विजयी झाले. तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. शशिकांत वाईकर तुम्हाला आता चमत्कार घडवयाचा असून आता दोन खोरी तुम्हाला बघायची आहेत असे सांगत सातारा-जावली विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी शशिकांत वाईकर यांची निवड झाल्याचे आमदार शिंदे यांनी जाहीर केले.
Previous Articleसातारा पंचायत समितीत शॉर्ट सर्किटने गणपतीच्या आरासीला आग
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.