भाजप प्रवक्ते दादा साईल यांची टीका
प्रतिनिधी / कुडाळ:
जिल्हा क्रीडा संकुल येथे शंभर खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारणार, अशी घोषणा आमदार वैभव नाईक यांनी नुकतीच केली. कोरोना महामारीने मार्च अखेरपासून संपूर्ण देशात थैमान घालायला सुरुवात केली. साधारणत: एप्रिलपासून सिंधुदुर्गात याची दाहकता जाणवण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आम्ही आरोग्य यंत्रणा सक्षम करा म्हणून जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहोत. परंतु त्यावेळी यांना जाग आली नाही, अशी टीका भाजपचे जिल्हा प्रवक्ते तुकाराम ऊर्फ दादा साईल यांनी केली आहे.
गणेश चतुर्थीसाठी जिल्हय़ात येणाऱया परजिल्हय़ातील लोकांना अतिरिक्त सवलती देण्याचा आत्मघातकी निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला घेण्यासाठी भाग पाडल्यामुळे गेले चार महिने दिवसाला सरासरी 20 ते 25 एवढे बाधित रुग्ण मिळण्याचे प्रमाण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून 200 रुग्ण प्रतिदिन एवढे झाले आहे. त्याचप्रमाणे बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. तेव्हा हे सत्ताधारी जागे होऊन तात्पुरते कोविड रुग्णालय उभारायला निघाले आहेत. त्यातही परत राजकारण आणि अर्थकारण आलेच, असे साईल यांनी म्हटले आहे.
कामे जाणूनबुजून रखडत ठेवली
खरं तर नारायण राणे पालकमंत्री असताना कुडाळ येथे शंभर खाटांचे महिला रुग्णालय आणि वेंगुर्ले येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊन कामही सुरू झाले होते. परंतु गेली सात वर्षे शिवसेनेचे पालकमंत्री असतानाही दोन्ही कामे जाणूनबुजून रखडत ठेवली गेली. आता या दोन्ही रुग्णालयांचे जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण होत आले आहे. फक्त वीज, पाणी आणि काही किरकोळ कामे करायची बाकी होती.
कोरोना बाधितांना तडफडून मरावे लागले नसते
गेल्या चार महिन्यांत पुढचा धोका लक्षात घेऊन जर पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी पाठपुरावा करून ही कामे पूर्णत्वास नेली असती, तर आज सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कोरोना बाधित रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बेड उपलब्ध नाही, आयसीयू नाही किंवा ऑक्सिजन नाही म्हणून तडफडून मरावे लागले नसते, अशी टीका साईल यांनी केली.
आरोग्यापेक्षा राजकीय हित महत्वाचे!
शिवसेनेच्या या मंडळींना सामान्य लोकांच्या आरोग्यापेक्षा त्यांचे राजकीय हित महत्वाचे वाटते. आज कुडाळ आणि वेंगुर्ले येथे जवळपास दीडशे खाटांची रुग्णालय इमारत तयार असताना जिल्हा क्रीडा संकुल येथे शासनाचा पैसा खर्च करून तात्पुरते कोविड रुग्णालय करणे म्हणजे ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे’, असेच म्हणावे लागेल, असे साईल म्हणाले.
..तर आरोग्य यंत्रणा सक्षमतेस मदत!
जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय उभारून त्यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा महिला रुग्णालय (कुडाळ) आणि उपजिल्हा रुग्णालय (वेंगुर्ले) येथील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी करीत जेणेकरून कोरोना बाधितांची सोय होईलच, पण त्यानंतरही जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास मदत होईल, असे साईल यांनी स्पष्ट केले.









