नगरसेवक तारक आरोलकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप
प्रतिनिधी / म्हापसा
कामरखाजन हमरस्त्यावर गेल्या दीड वर्षापासून समस्या निर्माण झाली आहे. याबूजनी जाणाऱया नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी सुमारे एक किलोमीटर अंतर कापावे लागते. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी काल अधिकाऱयांसमवेत या रस्त्याची पाहणी केली. मी व आपले भाऊ नगरसेवक विकास आरोलकर यांनी यापूर्वी आवाज उठविला होता मात्र काल येथे आमदार जोशुआ यांनी अधिकाऱयांसमवेत तपासणी केली असली तरी आमदारांना याबाबत काहीच माहीत नाही. आम्हाला विश्वासात न घेता येथे तपासणी करणे गैर आहे. आम्हाला मुद्दामहून तपासणीवेळी डावलण्यात आल्याचा आरोप नगरसेवक तारक आरोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
हमरस्ता काम सुरू झाले तेव्हापासून ही समस्या निर्माण झाली आहे. वॉर्ड 7 व 8 मध्ये बायपास 66 हमरस्ता गेला आहे. यासाठी मोर्चाही काढला होता. पेपरवर्क करून गडकरीजींना सुद्धा निवेदन दिले होते. 5 हजार लोकसंख्या या हमरस्त्यामुळे म्हापशापासून कटआऊंट झालेले आहे. म्हापसा मार्केट, जिल्हा इस्पितळ येथे येण्यास त्यांना त्रास होतो. तो प्रश्न त्वरित तडीस लावणे गरजेचे आहे. येथे बायपास वा ओवरपास करणे त्वरित काळाची गरज आहे. याची आमदार जोशुआ व ग्लेन टिकलो यांनी तपासणी केली असली तरी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. जेथे तपासणी केली तेथे पाणी भरतच नाही. आम्हाला विश्वासात घेतले असते तर आम्ही हा प्रश्न योग्यरीत्या मांडला असता असे ते म्हणाले.
आमदार जोशुआ विश्वासात घेतात. आज इस्पितळात बोलावले. येथे कार्यक्रम झाला मात्र जोशुआ की ग्लेन टिकलो यांनी विश्वासात घेतले नाही हे सांगता येत नाही. मागे 4 कार्यक्रम झाले तेथे आम्हाला डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. आमदारांना जी स्थानिक समस्या आहे ती त्यांना माहीत नाही तर त्यांनी आम्हाला विश्वासात घ्यावे असे श्री. आरोलकर म्हणाले.
हळदोणा मतदारसंघातून भाजप तिकिटसाठी दावा करणार
हळदोणा मतदारसंघातून आपण निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा सर्वत्र आहे असे आपणही ऐकले आहे. अद्याप आपण दावा केला नाही. लोकांनी पाठिंबा दिला व लोकांची इच्छा आहे तर विचारण्यास हरकत नाही. ऐनवेळी काही घडामोडी झाल्या व पक्षाकडून रिंगणात उतरल्यास हिरवा कंदील मिळाला तर आपण रिंगणात राहू शकतो. आपण भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजप उमेदवार म्हणून हळदोण्यातून तिकिटसाठी दावा करणार असल्याची माहिती श्री. तारक आरोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सर्वांची इच्छा असते की, मतदारसंघातून निवडणूक लढवावी त्याप्रमाणे आपलीही इच्छा आहेच. दोन पक्ष आपल्याकडे संपर्कात आहेत मात्र आपण त्यांना नकार दिला आहे. ग्लेन टिकलोच्या कामाचा आढावा मतदार बांधवांनी घेतला आहे त्याबाबत आपण काहीच बोलत नाही. तिकीट मागण्याचा संविधानी हक्क आहे तो आपण पक्षाकडे मागणार आहे. पितृपक्षामुळे माझी बोलणी झाली नाही. प्रदेशाध्यक्ष जसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान म्हापसा पालिकेच्या नगरसेविका कमल डिसोझा यांनीही म्हापशात तिकिटासाठी दावा केला आहे. कमल या म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या वॉर्डातून निवडून आल्या आहेत. त्यांच्याजवळ सुमारे 2500 मते आहेत. जर त्या निवडणूक रिंगणात उतरल्या तर याचा फटका विद्यमान आमदार जोशुआ यांना बसू शकतो. म्हापशात गेल्या पोटनिवडणुकीत अंदाडे दीड हजार मतानी विजयी झाले होते. नगरसेवक तथा काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांचा जोशुआंनी पराभव केला होता. आता कमल रिंगणात उतरल्यास राजकीय समीकरणात मोठा बदल घडून येऊ शकतो.









