काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे सरकार येण्याचा दावा
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसच्या 10 फुटीर आमदारांबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निवाडा तसाच कायम राहिल्यास तो लोकशाही व घटना यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे मत काँग्रेस गोवा प्रदेश कार्यकारिणीने प्रकट करून त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा ठराव एकमताने संमत केला आहे. दरम्यान काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला पूर्ण बहुमत मिळेल, आणि युतीचे सरकार स्थापन होईल, अशी खात्री काँग्रेसने वर्तविली आहे.
काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी व सर्व उमेदवार यांची संयुक्त बैठक पणजीतील गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या हॉलमध्ये घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी वरील माहिती दिली.
फुटीरांबाबत देण्यात आलेला निकाल धक्कादायक असून तो तसाच राहू देणे चुकीचे आहे. त्याचे घातक परिणाम लोकशाहीवर होण्याचा संभव आहे, म्हणून त्यास आव्हान देण्याशिवाय पर्याय नाही. येत्या दोन-तीन दिवसात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पंचायत वॉर्ड पुनर्रचना आक्षेप मुदत वाढवावा
पंचायत निवडणुकीसाठी वॉर्डाच्या करण्यात आलेल्या पुनर्रचनेतही पुन्हा घोळ झाला असून तो सोयीस्कर व स्वार्थी हेतूने झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावरील आक्षेपांसाठी देण्यात आलेली मुदत कमी असून ती वाढवण्याची मागणी करणारा दुसरा ठराव संमत करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान काँग्रेसची सदस्यता मोहीम 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर 1 एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत गट समित्या, जिल्हा समित्या, त्याचे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अशा विविध पक्षीय संघटनात्मक निवडणुका घेणार असल्याची माहिती निर्वाचन अधिकारी मोहन जोशी यांनी दिली.









