मराठा आरक्षण बदलाचा विधीमंडळात उठवला आवाज
खानापूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील मराठा समाजाला 3 ब प्रवर्गात घालण्यात आले आहे. पण राज्यातील मराठा समाजावर हा अन्याय असून त्या समाजाचे आरक्षण बदलून मराठा समाजाचा 2 ए, प्रवर्गात समावेश झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अंजली निंबाळकर यांनी कर्नाटक विधीमंडळात एका लक्षवेधी सुचनेद्वारे केली.
यावेळी त्या म्हणाल्या, राज्यात जवळपास 50 लाखावर मराठा समाज आहे. पण हा समाज अत्यंत मागासलेला आहे. यासंदर्भात नेमलेल्या शंकराप्पा आयोगाने मराठा समाजाला 2 ए प्रवर्गात समोवश करावा, अशी शिफारसही केली आहे. तर निवडणुकीपूर्वी आपण मराठा समाजाला 2 ए प्रवर्गात समाविष्ठ करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. याकडेही आमदार अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात कर्नाटकातील मराठा समाजाला 2 ए प्रवर्गात समाविष्ठ करण्याचा प्रश्न राज्य शासनाच्या विचाराधिन असून या संदर्भात मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यापासून आमदार अंजली निंबाळकर यांनी मराठा आरक्षण बदलाच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष घातले आहे. यासंदर्भात त्यांनी धारवाड येथे झालेल्या मराठा समाज मेळाव्यातही मराठा समाजाला 2 ए आरक्षण मिळवून घेतल्याशिवाय आपण गप्प राहणार नाही, अशी ग्वाही दिली होती. आणि या दृष्टीनेच त्यांनी कर्नाटक विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडून याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. राज्य शासनाने मराठा अभिवृद्धी महामंडळाची स्थापना करून त्याला 50 लाख रुपये दिले आहेत. पण यामुळे मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटू शकणार नाहीत, मराठा समाजाला खऱया अर्थाने न्याय मिळायचा असेल तर या समाजाचा 2 ए प्रवर्गात समावेश करणे हाच त्यामागचा योग्य उपाय ठरु शकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
एखाद्यावेळी राज्य शासनाने मराठा समाजाची ही मागणी वेळीच पूर्ण न केल्यास बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत तसेच 2 विधानसभा पोटनिवडणुकीत मराठा समाज बहिष्कार घालेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे..