एकीकडे उद्धव ठाकरेंचे घणाघाती शाब्दिक घाव, दुसरीकडे शरद पवारांचे मौन या दबावात भाजप, शिंदे सेना आणि अजितदादा गट असतानाच सरकार आमदारांच्या दबावालाही झुकल्याचे प्रत्येकी किमान 25 कोटी निधीच्या खैरातीवरून दिसते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांवर खर्चायला पैसा नाही पण चाळीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या येतात, मग अर्थसंकल्पाला काय अर्थ?
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही बार फुसके निघालेले आहेत. सगळ्यांच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. सत्ता आणि पैशापुढे कोणताही विचार चालत नाही हे सर्व पक्षाच्या आमदारांनी सिद्ध केलेले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर निधीची खैरात करणे ही सरकारची अगतिकता बनली आहे. पायाभूत सुविधांच्या असंख्य योजना निधी अभावी रखडत, रडतखडत चालल्या असताना एकेक आमदाराच्या मतदारसंघात 25 कोटीपासून साडेपाचशे कोटीपर्यंत रक्कम विकास कामांच्या नावाने मंजूर केल्याच्या घोषणा होत आहेत.
एक मुख्य आणि दोन उपमुख्यमंत्री अशी त्र्यैमूर्तीची शक्ती वाढण्याऐवजी अगतिकताच वाढल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनची करायची, 2037 साली अडीच ट्रिलियन आणि 2047 ला ती पाच ट्रिलियनची होईल असे स्वप्न सरकार पाहते. त्या दृष्टीने व्हिजन डॉक्युमेंट होत आहे. प्रत्यक्षात व्हिजनप्रमाणे पैसाच खर्च नाही. एकाही जिह्याचा नियोजनाचा खर्च वार्षिक आराखड्याप्रमाणे झाला नाही. एकही मंत्रालय आमदारांना भरघोस निधी देताना व्हिजन डॉक्युमेंटरी डोळ्यासमोर ठेवत नाही. जिल्हास्तरावरून अधिकाऱ्यांचा प्रस्ताव आला आणि त्यानुसार आमदारांना, मंत्र्यांना 500 कोटीपर्यंत विकास निधी मिळाला असे झालेले नाही. आमदारांनी सुचवले, सरकारने दिले! मंत्रीपदाची तहान निधीवर भागवली जात आहे. विशेष म्हणजे आमचे दहा हजार कोटी रुपये आधी भागवा मग नवीन कामे काढा असे सांगत कंत्राटदार कोल्हापूरात सरकार विरोधात उपोषणाला बसले आहेत! तरीही नवा निधी मंजूर होत आहे! चाळीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या होतात मात्र केंद्रेकरांसारखा अधिकारी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी चाळीस हजार कोटीची योजना आखा म्हणताच त्याला राजीनामा द्यावा लागतो. त्याला विधीमंडळात वाचाही फुटत नाही!
फुले का पडती शेजारी…
महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नाट्यागीत असे आहे, बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी?, माझ्यावरती त्यांची प्रीती, पट्टराणी जन तिजसी म्हणती, दु:ख हे भरल्या संसारी!, असेल का हे नाटक यांचे मज वेडीला फसवायाचे?, कपट का करिती चक्रधारी?, का वारा ही जगासारखा तिचाच झाला पाठीराखा, वाहतो दौलत तिज सारी! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पाठीराखे, सर्वच या नाट्यागीताप्रमाणे संशयग्रस्त आहेत.
पुराणकथेशी हा प्रकार जोडला तर आपणच दिल्लीश्वरांना ‘श्यंमतक मणी’ दिला असे प्रत्येकाला वाटते आणि आपणच त्यांच्याजवळ आहोत असेही! आधी रुक्मिणी आणि सत्यभामेचे शीतयुद्ध होते. त्यात अजितदादारुपी जाम्बुवंती आली! दादांना मुख्यमंत्री करणार नाही असे फडणवीसांना जाहीर करावे लागले. तर प्रफुल्ल पटेल म्हणतात, कधी ना कधीतरी दादा होणारच की! अजून काँग्रेस आणि अन्य कुठल्या कुठल्या पक्षातील नेते फोडलेच तर राज्याच्या राजकारणात कृष्णाच्या अष्टनायिकेप्रमाणे गर्दी वाढणार. त्यातून संशयग्रस्तता वाढली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे अजितदादांची तक्रार करून दमलेल्या आणि अधिकचा निधी मागणाऱ्या सेनेच्या आमदारांना सत्तांतर घडवूनही वाटणीला अजितदादाच आल्याने त्यांच्या पुढ्यातील प्राजक्ताचा सत्ता सुगंध सतावतोय. भाजप आमदार सत्ताकुपोषणामुळे कुढत आहेत. शिंदे सेनेच्या आमदारांवर अजितदादांनी आपल्याला भरपेट दिले असे सांगायची वेळ आली आहे.
ना विरोधी पक्ष नेता, ना दादांचा नेता
राष्ट्रवादीत अजून चलबीचल आहे. थोरल्या आणि धाकट्या पवारांच्या वादात आपला चेंदामेंदा नको म्हणून काहीजण विधानभवनाकडे फिरकलेही नाहीत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना साडेचारशे कोटी रुपये इस्लामपूर मतदारसंघासाठी दिले अशी चर्चा झाल्याने तिथेही आगडोंब उसळला असावा. तातडीने जयंतरावांनी आपल्याला फक्त पंचवीस कोटीच मिळाले असा खुलासा केला.
काँग्रेसला विधिमंडळ अधिवेशनात आपले हक्काचे विरोधी पक्षनेतेपद मिळवता आले नाही. अजितदादांचा गटनेता वेगळा दाखवला तर अडचणी होतील म्हणून हे सगळे थांबले आहे. त्यात काँग्रेसची अंतर्गत लाथाडी! आता अधिवेशनात सुट्ट्यांचा मौसम सुरू होतोय. पंतप्रधानांच्या दौऱ्यात तिन्ही सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या आमदारांना परेड करायची असल्याने अधिवेशनाला जादाची सुट्टी मिळाली
आहे. चार ऑगस्ट पूर्वी फक्त अंतिम आठवडा प्रस्ताव येईल आणि समृद्धी वरील अपघात ते इर्शाळवाडी दुर्घटना सगळ्याला श्रद्धांजली मिळेल. हा खरा राजकीय अल्झायमर! या अधिवेशनात रोहित पवारांसारखे नवे आमदार चमकून उठले. विरोधकांकडे बोलायलाही आमदार कमी पडत आहेत आणि सत्ताधाऱ्यांचे तोंड उघडत नाही. त्यामुळे कुठलेही मुद्दे औचित्याचे ठरून त्यातील औचित्य हरवले आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना मुलाखत दिली म्हणून टीका होत असली तरी त्यातील वक्तव्य भाजप आणि त्यांच्या मतदारांना हादरवून सोडणारी आहेत. जो नवा वर्ग ठाकरेंकडे आकर्षित होतोय त्यांना ते भावत आहेत. अजित पवार गटाचा उदोउदो सुरू असला तरी शरद पवार गप्प असल्याने फुटीर गटाच्या मनात धडकी भरलेलीच आहे. यावर उत्तर नसलेल्या भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना खेळवणे त्यांच्या पक्षाला बाधकच ठरण्याचीच चिन्हे आहेत.








