रविवारी रात्री चव्हाट गल्ली येथील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. मार्केट पोलिसांनी स्वतः एफआयआर दाखल करून घेतला आहे. या घटनेने रविवारी रात्री काहीकाळ तणावाची स्थिती होती.
चव्हाट गल्ली येथील कार्यालयावर दगडफेक झाली आहे. दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. चव्हाट गल्ली येथील सत्यम जोतिबा नाईक या तरुणाने दगडफेक केल्याची माहिती मार्केट पोलिसांना मिळाली असून पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
सत्यमने कोणत्या कारणासाठी दगडफेक केली याचा उलगडा झाला नाही. त्याला अटक झाल्यानंतरच यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे. रात्री पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच त्याने तेथून पळ काढला आहे.









