प्रतिनिधी/ बेळगाव
आमटीत पाल पडल्याने इटगी (ता. खानापूर) येथील सहा कामगारांना विषबाधा झाली आहे. खानापूर तालुक्मयातील तोलगी येथे रविवारी दुपारी ही घटना घडली असून या सर्व सहा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
तोलगी येथे एका नव्या घराची स्लॅबभरणी सुरू होती. यासाठी इटगी येथील कामगार गेले होते. त्यांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली होती. स्लॅबभरणीनंतर जेवताना आमटीत पाल पडल्याचे या कामगारांच्या लक्षात आले. त्यानंतर यामधील काही जणांना उलटय़ांचा त्रास सुरू झाला.
फकिरा रमेश गौरक्कण्णावर (वय 28), नागेश शेखर वालकेरी (वय 27), प्रवीण यल्लाप्पा वालकेरी (वय 26), अदृश्य सुरेश तळवार (वय 28), सिद्धाप्पा शिवाप्पा गुरण्णावर (वय 47), सहदेव निंगाप्पा गौरक्कण्णावर (वय 26) सर्व रा. इटगी अशी त्यांची नावे असून सुरुवातीला त्यांना खानापूर येथील तालुका इस्पितळात नेण्यात आले. तेथून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.









