मुस्लीम अपना दलासाठी अस्पृश्य नाहीत
अपना दल (एस)ची विचारसरणी हिंदुत्वापेक्षा वेगळी असल्याचे उद्गार भाजपच्या सहकारी पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी सोमवारी काढले आहेत. आमचा पक्ष वैचारिक स्वरुपात भाजपपेक्षा वेगळा आहे. मुस्लीम उमेदवार आमच्या पक्षासाठी अस्पृश्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हिंदुत्व आणि संबंधित सर्व मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जातात. परंतु माझा पक्ष धर्माचे राजकारण करत नाही. आम्ही सामाजिक न्यायासाठी उभे आहोत आणि हीच आमची विचारसरणी आहे. समाजातील वंचित वर्गासाठी आम्ही नेहमीच काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.
अपना दल (एस)कडून यंदा मुस्लीम उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्या बेगम नूर बानो यांचे नातू हैदर अली यांना अपना दल (एस)ने उमेदवारी दिली आहे. स्वार मतदारसंघात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला यांच्याविरोधात ते निवडणूक लढवत आहेत.
पक्षाचे संस्थापक सोनेलाल पटेल जिवंत असताना माझ्या पक्षाचे पहिले आमदार एक मुस्लीम होते. त्यांनी प्रतापगड शहर मतदारसंघात विजय मिळविला होता. अपना दलाचे अध्यक्ष म्हणून अनेक मुस्लीम नेत्यांनी काम केले आहे. याचमुळे माझ्या पक्षासाठी मुस्लीम अस्पृश्य नाहीत. मी उमेदवारांना धर्माच्या दृष्टीकोनातून पाहत नसल्याचे अनुप्रिया यांनी म्हटले आहे.
राज्यात रालोआच्या बाजूने वातावरण दिसून येत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्यात पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. लोकांनी उत्तरप्रदेशात सुशान आणि सर्वसमावेशक विकास पाहिला आहे. राज्याच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही सक्षम आहोत असे त्या म्हणाल्या.









