खा. संजय पाटील यांची राजकीय परिस्थितीवर मिश्किल टिप्पणी
प्रतिनिधी / विटा
आम्हाला लोकांसमोर देखावा करावा लागतो, ४०-४०लाखांच्या गाड्या वापराव्या लागतात. पण आमची कर्जे बघितली तर ईडी वाले म्हणतील, ही माणसं आहेत का कोण ? अशा शब्दांत खासदार संजय पाटील यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर मिश्कील टिप्पणी केली.
येथील जेष्ठ गलाई व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते उत्तमरावआण्णा पाटणकर यांच्या सूर्या विटा शॉपिंग मार्ट या मॉल चे उदघाटन खासदार संजय पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार अनिलराव बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, अशोकराव गायकवाड, बाबासाहेब मुळीक उपस्थित होते. यावेळी उत्तमराव पाटण कर यांच्या कार्याचे कौतुक करताना खासदार पाटील म्हणाले.
तासगावात असे एखादे मॉल असावे असे वाटायचे पण ते विट्यात आता झाले आहे. माणसं शक्यतो हातातले काही दाखवत नाहीत. पण आम्ही राजकीय माणसं हातात काही नसताना दाखवण्याचा प्रयत्न करतो. कर्जे काढून ४० लाखांच्या गाड्या आम्हाला वापराव्या लागतात. तसेच वैभव पाटील यांच्याकडे पहात खा. पाटील म्हणाले, वैभवदादांची आणि अशोक भाऊंची गोष्ट वेगळी, ते उद्योगांवर प्रेम करत करत राजकारण करतात. पण मी आणि अनिलभाऊंची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. आम्हाला आता काही नसले तरी चांगले आहे.
असे दाखवावे लागते. आमच्या कर्जाचे आकडे बघितले तर गमती गमतीत हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, मी भाजप मध्ये आलोय, आता झोप चांगली लागते मला, तसं आमची कर्जे बघितली. तर ईडी म्हणेल ही माणसं आहेत. का काय आहेत. माझ्या सांगण्याचा मथितार्थ इतकाच आहे, की अत्यंत चांगल्या पद्धतीने हा मॉल उभारला आहे. अलीकडच्या काळात मुलांना ब्रँडेड कपडे ब्रँडेड वस्तू वापरण्याची सवय लागली आहे. त्यादृष्टीने हा मॉल अत्यंत योग्य वेळेत तुम्ही सुरु केला आहे. यावेळी आमदार अनिलराव बाबर यांनी आपल्या भाषणात विटा शहर आणि तालुक्याची शान वाढवणारा हा मॉल असल्याचे सांगितले. प्रारंभी उत्तमराव यांचे चिरंजीव श्रीकांत आणि सूर्यकांत पाटणकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून चांदीच्या मूर्ती भेट दिल्या. यावेळी नंदूकाका पाटील,शंकरनाना मोहिते, उत्तमराव चोथे आदी उपस्थित होते.









