तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेतला निर्णय

प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बेळगावात सुवर्णसौधची उभारणी करण्यात आली. त्याठिकाणी अधिवेशन भरविण्यात येत आहे. यावषीही 13 डिसेंबर रोजी अधिवेशन भरविण्यात येणार आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.
मराठा मंदिर रेल्वेओव्हरब्रिज येथे तालुका म. ए. समितीची बैठक रविवारी घेण्यात आली. यावेळी हा निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. प्रारंभी सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर हा मेळावा भरवून सरकारला योग्य प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो येथे मेळावा घेण्याबाबत ठरविण्यात आले आहे. यावेळी मनोहर किणेकर म्हणाले, मराठी भाषिकांना डिवचण्यासाठीच येथे अधिवेशन भरविले जात आहे. तेव्हा त्याला प्रत्येकवेळी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळीही भव्य प्रमाणात मेळावा भरवून मराठी भाषिकांची एकजूट दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, येथील मराठी जनतेला महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा आहे. गेली अनेक वर्षे लोकशाहीमार्गाने लढा लढला जात आहे. मात्र कर्नाटक सरकार जाणूनबुजून नाहक त्रास देत आहे. तेव्हा आता कर्नाटक सरकारला ताकद दाखवायची आहे. त्यासाठी प्रत्येक गावात बैठका घेऊन जनजागृती करावी. बैठकीत मनोज पावशे, एस. एल. चौगुले, म्हात्रू झंगरुचे, कृष्णा हुंदरे, जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील, तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अष्टेकर, रावजी पाटील, भागोजी पाटील, मनोहर संताजी, रामचंद्र मोदगेकर, यशवंत मोरे, मनोहर हुंदरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. एम. जी. पाटील यांनी आभार मानले. बैठकीला बेळगाव तालुक्मयातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









