नेटफ्लिक्स या ऑनलाईन व्यासपीठावर सध्या एक मालिका जगभर गाजत आहे. त्या मालिकेला एवढा भरभरून प्रतिसाद मिळत आहे की ती नेटफ्लिक्सवरील आत्तापर्यंतची सर्वात मोठी मालिका ठरली आहे. ही मालिका म्हणजे ‘स्क्विड गेम’. मूलतः कोरियन भाषेमध्ये बनवल्या गेलेल्या या मालिकेचे भाषांतर आता तब्बल 13 भाषांमध्ये केले गेले आहे. या मालिकेमध्ये एक अज्ञात संघटना काही कर्जबाजारी व्यक्तींना करोडो रुपयांसाठी 6 खेळांमध्ये भाग घेण्याची संधी देते. गम्मत अशी आहे की हे सर्व खेळ कोरियामधील प्रसिद्ध बालपणीचे खेळ असतात. पण, एका जरी खेळात ते हरले, तर नुसते काढून टाकले जात नाही तर तिथल्या तिथे त्यांचा जीव घेतला जातो. ही मालिका बालपणातील खेळांना एक भीतीदायक वळण देते आणि हताश मनुष्य पैशांसाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचीदेखील झलक आपल्याला मिळते.
बालपणात शक्मयतो मुलांचे मन स्फटिकासारखे असते. खेळ खेळताना त्यांच्या अपेक्षा अगदीच मोजक्मया असतात. आपण खेळ जिंकावा, कौतुक करून घ्यावे, आणि घरी जावे. हेच बक्षीस जगापासून अलिप्त असलेल्या एका लहान मुलासाठी पुरेसे असते. यावरून मानवी विकासाबद्दल खूप काही लक्षात येते. कुठलाही लहान मुलगा किंवा मुलगी, जन्मतः हिंसक वृत्ती घेऊन जन्माला येत नाही. तेवढा पुढचा विचार करण्याची क्षमताही त्या चिमुकल्या मेंदूमध्ये नसते. मग असे असूनही, जगात हिंसक, विध्वंसक आणि राक्षसी वृत्तीच्या माणसांची संख्या वाढताना का दिसत आहे? मानवजातीला नावे ठेवण्यापेक्षा या विषयाच्या मुळाशी जायला हवे.
बऱयाच शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की माणसाच्या मेंदूची वाढ ही वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत होत असते. जन्मापासून आपल्या आजूबाजूला घडणाऱया गोष्टी, माणसं, संवाद, शिकवण अशा कित्येक गोष्टी मेंदूच्या वाढीसाठी उत्तेजन बनतात. ज्या गोष्टी मनुष्य अनुभवतो, जसे संस्कार त्याच्यावर होतात आणि ज्या प्रकारचा मजकूर त्याचा मेंदू शोषत असतो, तसा त्याच्या विचारांना आकार मिळत जातो आणि त्याचे व्यक्तिमत्व घडायला सुरुवात होते.
एवढेच नव्हे तर जन्माला यायच्या आधी गर्भात असतानादेखील बाळाचा बाहेरचा जगाशी संबंध जोडलेला असतो. गर्भात असतानादेखील त्या बाळाला त्याच्या आई-वडिलांची आणि आजूबाजूला घडणाऱया घडामोडींची जाणीव असते. अशावेळेला बालपणात मुलांकडे अधिक बारकाईने लक्ष द्यावे लागते. अशा वेळेला जर का आई वडिलांची सोबत मिळाली नाही किंवा चुकीचा मजकूर मेंदूत शिरला, तर त्याचा व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
समाज हा सतत विकसित होत असतो. सध्याच्या तंत्रज्ञान प्रभावित जगाने समाजाचा कायापालट केला आहे. याचे सगळय़ात मोठे उदाहरण आपल्याला कोरोना महामारीच्या काळात सगळीकडे बघायला मिळते आहे. सगळेच जग जणू ऑनलाईन झाले आहे. कधीकाळी मैदानी खेळ खेळणारी, बागडणारी मुले आज ऑनलाइन व्हीडिओ खेळ खेळताना आपल्याला दिसतात. शाळा सोडली तर मैदानी उपक्रम मुलांना नवनवीन ओळखी बनवून समाजाचा एक भाग होण्याची संधी देतात. इतरांबरोबर खेळताना त्या मुलाला इतरांच्याप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव होते आणि तो एका समूहाचा भाग होतो.
पण ऑनलाइन व्हीडिओ खेळांमध्ये हा मानवी स्पर्श कुठेतरी गहाळ झाला आहे. आभासी आणि वास्तविक जगातील सर्वात मोठा फरक हा आहे की वास्तविक जगात माणसाला शारीरिक, सामाजिक आणि मानसिक बंधने आहेत. पण आभासी जग माणसाच्या सर्व मर्यादा पार करून अनंत शक्मयता माणसासमोर मांडते. खरंतर दूरचित्रवाणीवरील खेळांचा शोध 1958 साली लागला होता. पण भारतामध्ये त्याची प्रसिद्धी ही 1990 नंतर वाढू लागली. आधी संगणकावर खेळल्या जाणाऱया खेळांसाठी आता वेगळे यंत्र बनायला सुरुवात झाली होती. हे खेळ संगणकावर जोडले असल्याने ते एका जागेवर बसूनच खेळले जातात. शारीरिक हालचाल कमी आणि मानसिक उत्तेजन या खेळाद्वारे होते. एवढच नव्हे तर थ्रीडी तंत्रज्ञानामुळे माणसाला तो खेळ खेळताना त्या खेळातील जगामध्ये पदार्पण केल्यासारखेदेखील वाटते. ही तंत्रज्ञानाच्या जगातील एक खूप मोठी प्रगती आहे. या खेळाद्वारे माणूस अशा काही गोष्टी अनुभवतो, ज्याची त्यांनी कधी काळी फक्त कल्पनाच केली असेल. अगदी लहान मुलांपासून ते मोठय़ा माणसांपर्यंत सर्वजण या आभासी खेळांचा आस्वाद घेऊ शकतात.
जसे एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच या तंत्रज्ञानातील प्रगतीला एक धोकादायक पैलूदेखील आहे. काही खेळ अशा पद्धतीने आखले गेले असतात की त्यातील मुख्य पात्राला जिंकण्यासाठी मारहाण आणि गोळीबार करावा लागतो. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या खेळांमधील आभासी पात्रे आपल्या आजूबाजूच्या माणसांसारखी भासतात. त्यामुळे आभासी आणि वास्तविकमधील जी मर्यादा आहे ती फिकट होत चालली आहे. अल्लड लहान मुले जेव्हा असे खेळ खेळतात तेव्हा मारहाण, गोळीबार व हिंसा यासारख्या राक्षसी गोष्टी त्यांना सामान्य वाटू शकतात.
काही बटनांच्या प्रयोगाने आपल्याला हवे ते मिळते हे जर त्यांना वाटू लागले तर तीच अपेक्षा ते त्यांच्या सामाजिक आयुष्यातदेखील करू शकतात. आणि हिंसक मजकूर जर लहानपणापासून त्यांच्यासमोर दिसत राहिला, तर त्यामुळे पुढे नुकसानदेखील होऊ शकते.
जगातील स्पर्धेचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये स्वतःचे घर सांभाळणे, समाजामध्ये आपली जबाबदारी पार पाडणे आणि मग उरल्या सुरल्या वेळात आपली काळजी घ्यायला आईवडील थडपड करत आहेत. वाढत्या महागाईच्या चक्रात अडकल्यामुळे, नाईलाजाने त्यांना आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देणे शक्मय होत नाही आहे. अशा वेळेला मुलांना व्हीडिओ खेळ लावून दिले की आई वडिलांना आपल्या कामाकडे लक्ष देता येते. पुढच्या पिढीला जर एक विकसित पण जागरूक पिढी बनवायची असेल तर त्याची जबाबदारी आजच्या वरि÷ांनी घेतली पाहिजे.
स्वतःचा अनुभव, समाजातील पूर्वीच्या चुका समजून, सुधारित संस्कार आजच्या लहान मुलांवर केले पाहिजेत. तंत्रज्ञान जरी आज आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक झाले असले तरी त्यावर अवलंबून राहून चालणार नाही ही शिकवण मुलांना दिली पाहिजे. स्वतःच्या मनाची, शरीराची योग्य ती काळजी घ्यायला शिकवले पाहिजे. समाजाची वाईट बाजू न लपवता, त्याबद्दल योग्य ते शिक्षण मुलांना दिले तर समाजाप्रती त्यांच्या जबाबदारीची जाणीव त्यांना होईल. व्हीडिओवरील खेळ मनोरंजनाचा एक उत्तम मार्ग आहेत, पण आपण कोणते खेळ खेळतो व त्याचा मनावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. या तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मकरित्या करता येऊ शकतो. नवीन शैक्षणिक मजकूर घरबसल्या अनुभवायला या थ्रीडी माध्यमाचा उपयोग केला तर ही शिक्षणातील सर्वात मोठी क्रांती ठरेल! पुढच्या पिढीची जबाबदारी आजच घेऊन, जगाचे भविष्य विश्वसनीय करूया आणि मानवी विवेक वाया जाण्यापासून थांबवूया!
श्राव्या माधव कुलकर्णी








