ब्रिटनच्या वैज्ञानिकांकडून विधान
कोरोना विषाणूचे नवनवे संकरावतार समोर येत असल्याने वैज्ञानिकांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या स्वरुपात लस अपयशी ठरू शकते, असे ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ब्रिटनसह दक्षिण आफ्रिका तसेच नायजेरिया समवेत अनेक देशांमध्ये कोरोनाचे नवे संकरावतार आढळून आले आहेत. हे स्वरुप पूर्वीपेक्षा अधिक फैलाव करणारे आहेत. युरोप आणि जगातील अन्य हिस्स्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमागे हेच नवे स्वरुप कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेत मिळालेला नवा संकरावतार चिंता निर्माण करत असल्याचे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी म्हटले आहे. सरकारच्या एका वैज्ञानिक सल्लागाराने दक्षिण आफ्रिकन संकरावतारावर लस अपयशी ठरू शकत असल्याचे म्हटल्याने हॅन्कॉक यांनी चिंता व्यक्त केली आहे. तीन राज्यांमध्ये कोरोनाचा नवा संकरावतार ‘501वाय.व्ही2’ चे रुग्ण सापडल्याची घोषणा दक्षिण आफ्रिकेने 18 डिसेंबर रोजी केली होती. या नव्या संकरावताराच्या स्पाइक प्रोटीनमध्ये मोठे बदल झाल्याने वैज्ञानिक सतर्क झाले आहेत. स्पाइक प्रोटीनचा वापर करूनच विषाणू माणसाला संक्रमित करत असतो. या संकरावतारामुळे शरीरातील विषाणूंचे प्रमाण वाढते. हा संकरावतार आतापर्यंत 4 हून अधिक देशांमध्ये आढळला आहे. काही दिवसांमध्ये यासंबंधी अधिक माहिती समोर येऊ शकते. नव्या संकरावतारावर लसीची चाचणी केली जात असून 6 आठवडय़ांनी यासंबंधी बोलता येणार असल्याची माहिती बायोएनटेक या जर्मन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगुर साहिन आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील मेडिसीनचे प्राध्यापक जॉन बेल यांनी दिली आहे. बेल हे ब्रिटनच्या सरकारच्या लस विषयक कृतिदलाचे सल्लागारही आहेत. दक्षिण आफ्रिकन संकरावताराच्या विरोधात नवी लस तयार करण्यास 6 आठवडय़ांचा कालावधी लागू शकत असल्याचे बेल यांनी म्हटले आहे.
अधिक फैलाव नाही
दक्षिण आफ्रिकेतील संकरावतार अधिक वेगाने फैलावत नाही. ब्रिटनच्या संकरावताराप्रमाणे तो वेगाने फैलावत असल्याचे कुठलेच पुरावे आतापर्यंत मिळाले नसल्याचे डब्ल्यूएचओच्या तांत्रिक प्रमुख मारिया वॅन केरखोव्ह यांनी म्हटले आहे.









