प्रतिनिधी/ रत्नागिरी
आठ वर्षांपूर्वी रत्नागिरीतून सातासमुद्रापार दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात लागवड केलेला हापूस आंबा सुमारे तीन महिने अगोदरच भारताच्या बाजारात दाखल होऊ लागला आहे. रत्नागिरीच्या बाजारातही या ‘मालावी हापूस’ने एन्ट्री केली असून सध्या 3 हजार रुपये डझनाने त्याची विक्री होत आहे.
एका उद्योजकाने 2012 मध्ये दापोली येथून हापूसचे 40 हजार मातृवृक्ष आफ्रिका खंडातील मालावी देशात नेऊन सुमारे 600 हेक्टर जमिनीवर त्याची लागवड केली होती. मलावीचे हवामान कोकणातील हवामानासारखेच असल्याने तिथे आंब्याला चांगली फळधारणा होत असल्याचे सिध्द झाले. मालावी हापूसचा हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत असतो. 2016 मध्ये या आंब्याचे उत्पादन सुरू झाले. त्या वेळी तुरळक प्रमाणात मालावी हापूस भारतात विक्रीसाठी आला होता.
गेली काही वर्षे कोकणच्या हापूस हंगामापूर्वीच मलावी हापूस’ बाजारात दाखल होऊ लागला आहे. त्यामुळे येथील आंब्यांच्या हंगामापूर्वीच यंदा रत्नागिरीकरांना आफ्रिकन मलावी हापूसची चव चाखता येणार आहे. नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये हा हापूस दाखल झाला. रत्नागिरीतील फळविक्रेते सतीश पवार यांनी गतवर्षी प्रमाणेच यंदाही दिवाळीच्या हंगामातच तो रत्नागिरीकरांसाठी उपलब्ध केला आहे. गतवर्षी रत्नागिरीत त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता.









