प्रतिनिधी/ पणजी
‘आप’ म्हणजे भाजपची ‘बी’ टिम असल्याची टीका काँग्रेसने केली असून वीजदारांवरुन त्या दोन्ही पक्षांनी पोरखेळ चालवले असल्याचे म्हटले आहे. कोळसा आणि रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प म्हणजे मोठा घोटाळा असून त्या ज्वलंत विषयाकडे दुर्लक्ष होण्यासाठीच दोन्ही पक्षांची नाटके असल्याचे मत काँग्रेसने प्रकट केले आणि् ‘आप’ वर हल्ला चढवला.
काँग्रेस प्रवक्ते ट्रॉजन डिमेला, श्रीनिवास खलस देवसुरभी यदुवंशी यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की ‘आप’ चे नेते गोव्यात जनतेला टोपी घालण्यासाठी येत असून गोमंतकीय जनता त्या टोपीला बळी पडणार नाही मागील निवडणुकीत ‘आप’ ला जनतेने गोव्यातून हद्दपार केले होते. त्यांचेच नेते पुन्हा एकदा गोव्यात येवून जनतेला भुल- थापा देत आहेत आणि महत्वाच्या विषयांकडून दुसरीकडेच जनतेचे लक्ष वळवू पहात आहेत. गोव्यातील खरी निवडणूक लढाई आप व भाजपमध्ये होणार असा जावईशोध ‘आप’चे नेते राघव चढ्ढा यांनी लावला असून ते फक्त गोव्यात येवून वीजेवर बोलले. कोळसा- रेल्वे दुपदरीकरण या विषयावर बोलण्याचे धाडस त्यांना झाले नाही आणि त्यांनी ते टाळले अशी टीका ‘आप’वर करण्यात आली. निवडणूक जवळ आली की ‘आप’चे नेते जागे होतात आणि गोव्यात येतात. तोपर्यंत त्यांचा पत्ता नसतो. ते भाजपचे एजंट म्हणून काम करीत असून गोव्यातील मतदारांचा अपमान करीत आहेत. त्यांच्याशी प्रतारणा करीत असून त्यांना गोव्याची ‘अजीब’ जनता धडा शिकवेल असे डिमेलो म्हणाले.
दिल्ली सर्वात जास्त प्रदुषित शहर आहे आणि तेथे कोरोनाचे थैमान चालू आहे. त्या प्रश्नाकडे ‘आप’ ने लक्ष द्यावे. दिल्लीच्या जनतेला फसवले म्हणून ते आता गोव्यातील जनतेला फसवायला येत आहेत असा आरोप डिमेलो यांनी केला.









