राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांचे प्रतिपादन : राजकीय पोकळी भरून काढण्याचे सामर्थ्य केवळ आपमध्ये
जय नाईक /पणजी
काँग्रेस, भाजपने बरीच वर्षे आळीपाळीने गोव्याला लुटले. लोकांनी पक्ष बदलले तरी चेहरे बदलू शकले नाहीत. दोन्ही पक्षात तेच तेच चेहरे. सध्या भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरल्या आहेत. परिणामी गोव्यात एक खूप मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी लोक आम आदमी पक्षाकडे आशेने पाहत आहेत, असे मत आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी व्यक्त केले आहे.
दै. तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेस आणि भाजप हे दोघेही जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. त्यांनी मतांचा बाजार मांडला आहे. मतदान गुप्तरित्या होत असले तरी नंतर आमदारांची खरेदी-विक्री खुलेआम उघडपणे होत आहे. हा सर्व बाजारूपणा, खोटारडेपणाला गोव्यातील जनता कंटाळली आहे. अशावेळी त्यांना आपमध्ये आशेचा किरण दिसत आहे. या पक्षात काहीतरी वेगळेपणा असल्याचे जाणवत आहे. म्हणुनच दिल्लीतील यशानंतर गोमंतकीयांनीच आम आदमी पार्टीला गोव्यात आणले आहे. हे सत्य आहे. अतिशयोक्ती नव्हे, असे चड्डा म्हणाले.
कडधान्य वितरण हा गोमंतकीयांप्रती आदरभाव
मोफत धान्य वितरण करणे ही राजकीय लाच नव्हे. लोकांना लाचार बनविण्यासाठी आम्ही हे धान्य वाटत नाहीत. गोमंतकीयांप्रती तो आदरभाव आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात अनेकांच्या नोकऱया गेल्या. धंदे बंद पडले. कितीतरी लोकांची कमाईची साधने हिरावली गेली. कुणाला उपाशीपोटी तर कुणाला अर्धपोटी झोपावे लागले. परंतु स्वतःला गोव्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणवणाऱया भाजपने वा त्यांच्या सरकारने तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेसुद्धा याकडे जराही लक्ष दिले नाही. त्यांनी गोमंतकीयांना वाऱयावर सोडले. सर्वजण घरी बसून राहिले. याऊलट आपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर हॅल्पलाईन, ऑक्सिमिटर यांच्या निमित्ताने वेळोवेळी घरोघरी भेटी दिल्या. लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. कडधान्याच्या रुपात अन्न पोहोचविण्याचे सत्कार्य केले. असे कार्य म्हणजे एखाद्यास लाचार करणे म्हणता येईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोफत देणे म्हणजे लाचार बनविणे नव्हे
दिल्लीत आम्ही मोफत वीज, पाणी, महिलांना बस प्रवास, यासारख्या अनेक सुविधा देतो. याचा अर्थ तेथील लोक लाचार बनले आहेत का? एखाद्याला कितपत मोफत द्यावे याच्या मर्यादा आम्हाला माहीत आहेत. जे लोकांच्या हक्काचे आहे तेच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सरकारकडे येणारे पैसे हे लोकांचेच असतात. त्यामुळे त्यातील थोडातरी वाटा पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचविणे व प्रत्येकाला सन्मानाचे जीवन जगू देणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य असते. दिल्लीत आम्ही तेच करत आहोत. हे केवळ आम्हीच करत आहोत, अशातला भाग नाही. अनेक युरोपीय देश आपल्या नागरिकांना अशा सुविधा देत आहेत. त्यामुळे गोव्यातही अशा योजना लागू करण्यात गैर नाही. त्या लागू करणे नक्की शक्य आहे, असे ठाम मत चड्डा यांनी व्यक्त केले.
बळकट संघटना हा आमचा खजिना
यावेळी गोव्याच्या विधानसभेत आमचा प्रवेश नक्की आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून शिडीची एक पायरी आम्ही चढलेलोच आहे. त्यामुळे विधानसभेत पाऊल ठेवणे फार कठीण बनणार नाही. आम्ही खूप लहान पार्टी असलो तरीही आमची संघटना फार मोठी आहे. आमचेही स्वतःचे केडर आहे. आमच्याकडे नेता नसला तरीही कार्यकर्तारुपी धनाचा फार मोठा खजिना आहे, असे ते म्हणाले.
भाजपला स्वतःचे दोन खासदार पाहण्यासाठी दहा वर्षे लागली होती. त्या मानाने आपची सुरवात खूप लवकर झालेली आहे. 2017 च्या निवडणुकीत लोकांसाठी आप एक पर्याय होताच. परंतु लोकांना त्याच्या प्रत्यक्ष कार्याची ओळख नव्हती. आज आम्ही प्रत्येक गोमंतकीयाच्या हृदयात जागा बनवली आहे. स्वतःची ओळख, विश्वास निर्माण केला आहे. आमचे काम लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आम्ही त्यांच्यासाठी खऱया अर्थाने पर्याय ठरलो आहे, असेही त्यांनी यांनी सांगितले.
’राजकारण स्वच्छता’ मोहीम यशस्वी होईल
गोव्याचे राजकारण स्वच्छ करण्याची जी मोहीम आम्ही सुरू केली आहे त्याद्वारे आम्ही पुन्हा एकदा प्रत्येक गोमंतकीयापर्यंत पोहोचणार आहोत. लोकांनाच गोव्याचे राजकारण स्वच्छ झालेले हवे आहे. आम्ही त्यांना ते माध्यम मिळवून देणार आहोत. भाजप, काँग्रेसकडून चाललेल्या ’वोट आणि नोट’ च्या बाजारूकरणापासून मुक्ती देणार आहोत. आम्हाला ’आमदार’ हवे ’घातदार’ नव्हे, हे पटवून देताना नव्या पर्यायाद्वारे त्यांचा विश्वास, भरोसा पुन्हा मिळवून देणार आहोत. या मोहिमेद्वारे एखाद्या पक्षाचे खंदे समर्थक तथा मतदार असलेले लोक सुद्धा बदलतील, असा विश्वास चड्डा यांनी व्यक्त केला.
निवडणुकीला सध्या बराच अवधी आहे. त्यामुळे या घडीला तरी युतीसंदर्भात कोणताही विचार झालेला नाही. आधी उमेदवार ठरतील, त्यांच्यातील जिंकण्याची क्षमता पाहिली जाईल, त्यानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही जनतेची ’ए टीम’
दिल्लीत भाजपा आम्हाला काँग्रेसची ’बी टीम’ संबोधतात तर गोव्यात काँग्रेस आम्हाला भाजपची ’बी टीम’ असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात आम्ही कुणाचीही कोणतीही टीम वगैरे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्याएवढी क्षमता आम्ही निर्माण केली आहे. ही वाढती लोकप्रियता आणि व्याप पाहून असे राजकीय आरोप होत असतात. आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही जनतेची ’ए टीम’ आहोत, असे चड्डा म्हणाले.
खाणी सुरू होणे आवश्यक
राज्याला सर्वाधिक रोजगार देणारा खाण व्यवसाय सुरू होणे ही काळाची गरज आहे. आम्ही त्याचे पूर्ण समर्थन करतो. परंतु गत काही सरकारनी या विषयात जो चिखलकाला करून ठेवला आहे तो आधी साफ झाला पाहिजे. त्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु सध्याचे आळशी सरकार आणि त्यांच्या आमदारांमुळे हा प्रश्न लटकला आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावे लागत आहेत.
लिनीयर प्रकल्पांना विरोध कायम कोळसा हब, रेल्वे मार्ग दुपदरीकरण, तमनार या प्रकल्पांमुळे गोव्याचा कोणताही फायदा होणार नाही. म्हणुनच आपने प्रारंभापासूनच या प्रकल्पांना विरोध केला आहे आणि तो विरोध कायम राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.









