12 सप्टेंबरपर्यंत वाढला जामिनाचा कालावधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जैन यांची प्रकृती पाहता न्यायालयाने वैद्यकीय आधारावर त्यांचा अंतरिम जामीन कालावधी 12 सप्टेंबरपर्यंत वाढविला आहे. तर याप्रकरणाच्या सुनावणीतून न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा यांनी अंग काढून घेतले आहे. यामुळे याप्रकरणी नवे खंडपीठ स्थापन केले जाणार आहे.
21 जुलै रोजी सत्येंद्र जैन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. 26 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जैन यांना 6 आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्याची आणि विनाअनुमती दिल्लीतून न बाहेर पडण्याची अट जैन यांच्यावर घालण्यात आली होती.
जैन यांना त्यांच्या इच्छेनुसार कुठल्याही रुग्णालयात उपचार करवून घेण्याची अनुमती न्यायालयाने दिली होती. तुरुंगात जैन यांचे वजन 35 किलोंनी कमी झाल्याचा दावा त्यांच्या वकिलाने जामिनाची मागणी करताना केला होता. तत्पूर्वी त्यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला होता









