कुडचडे, सांगे, सावर्डे, काणकोण, वाळपई, कुठ्ठाळी, कुंभारजुआ, सांत आंद्रेत घरोघरी प्रचार
प्रतिनिधी / पणजी
जनतेला प्रामाणिक प्रशासनाचा फायदा मिळावा यासाठी आम आदमी पार्टीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आपच्या विविध भागात झालेल्या परिवर्तन यात्रेदरम्यान करण्यात आले. कुडचडे, सांगे, सावर्डे आणि काणकोण येथे परिवर्तन यात्रा काढली या यात्रेला स्थानिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. गाब्रिएल फर्नांडिस, अभिजीत देसाई, अनिल गावकर, अनुप कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली या यात्रा काढण्यात आल्या.
मंत्रीपदी असूनही कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल मतदारसंघातील विजेची समस्या सोडवू शकले नाहीत, अशी टीका करण्यात आली. खाणकाम बंद झाल्यामुळे कुडचडे मतदारसंघाला मोठा फटका बसला आहे. या परिसरातील खाणींशी संबंधित सर्व उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प आहेत. पर्यायी नोकऱया नसल्याने तरुणांमध्ये नाराजी आहे. मात्र त्यांच्या समस्या मंत्री सोडवू शकले नाही, असे गाब्रिएल फर्नांडिस म्हणाले.
सांगे परिसरही खाणबंदीमुळे खूप प्रभावित झाला आहे. संजीवनी साखर कारखाना बंद पडल्याने शेतकऱयांकडे उत्पन्नाचे साधनच नाही. भ्रष्टाचाराने प्रत्येक सरकारी क्षेत्राला वेठीस धरले आहे. त्यातून लोक संतापले असून आता त्यांना बदल हवा आहे. हा बदल केवळ आपच देऊ शकते असे अभिजीत देसाई म्हणाले
सावर्डे येथे मेळाव्यास संबोधित करताना आप नेते अनिल गावकर यांनी खाणी पुन्हा सुरू होणे ही काळाची गरज आहे, ज्यामुळे लोकांना रोजगार मिळेल असे सांगितले. आप गोमंतकीयांच्या कल्याणासाठी काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांपासून काणकोणमध्ये अनेक समस्या आहेत. विकासाची आश्वासने देत विद्यमान आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. मात्र त्यांनी केवळ आपल्या खिशाचा विकास केला आहे. काणकोणची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटनावर अवलंबून आहे. त्यावर महामारी आणि लॉकडाऊनमुळे नकारात्मक परिणाम झाला आहे. अन्य उद्योग आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. तरुण नोकऱयांच्या फसवणुकीला कंटाळले आहेत. अशावेली ’आप’ नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणेल, असे काणकोण विधानसभा प्रभारी अनुप कुडतरकर यांनी सांगितले.
आप चा वाळपईत प्रचार
वाळपईतील लोक भाजप आणि काँग्रेसला कंटाळले असून आप’च्या हमीची अपेक्षा करत आहेत, असे आपचे वरि÷ उपाध्यक्ष सत्यविजय नाईक यांनी सांगितले. ज्योएल फर्नांडीस, गोरखनाथ केळकर आणि सांत आंदे प्रभारी नामदेव माशेलकर यांच्या उपस्थितीत अनुक्रमे वाळपई, कुठ्ठाळी, कुंभारजुआ व सांत आंदे मतदारसंघात घरोघरी प्रचारादरम्यान ते बोलत होते.
दिल्लीवासी अनुभवत असलेल्या परिवर्तनाबद्दल लोक वाचत आहेत. शिक्षण क्षेत्रात केजरीवाल सरकार करत असलेल्या कामामुळे ते प्रभावित झाले आहेत. त्यामुळे गोव्यातही आपच्या अंतर्गत दिल्लीप्रमाणे कायापालट होईल, अशी लोकांना आशा आहे’’ असे नाईक पुढे म्हणाले.
कुठ्ठाळीत औद्योगिक वसाहत असूनही स्थानिकांना नोकऱया मिळत नाहीत. त्यामुळे तरुणांना नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई, बंगळुरू आणि अन्य शहरांमध्ये जावे लागते. या समस्येवर ’आप’ निश्चितच तोडगा काढेल, असे आश्वासने ज्योएल फर्नांडिस यांनी दिले.
गेल्या निवडणुकीत विद्यमान आमदारांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन जनतेची फसवणूक केली. आज ते सत्ताधारी पक्षात असूनही कोणताही विकास झालेला नाही. सांतआंदे मध्ये बेरोजगारीचा दर जास्त आहे असे प्रभारी नामदेव माशेलकर यांनी सांगितले. बहुतेक टॅक्सीचालक असलेल्या रहिवाशांसमोर रोजीरोटीचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. महामारीच्या काळात त्यांना कोणताही पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे तरुणात नैराश्य पातळले आहे, असेही माशेलकर म्हणाले.









