पहिल्या यादीत चार भंडारी : चार ख्रिस्ती उमेदवारांना स्थान
प्रतिनिधी /पणजी
पुढील महिन्यात होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने शुक्रवारी राज्यातील दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात चार भंडारी व चार ख्रिस्ती उमेदवारांचा समावेश आहे.
ही यादी जाहीर केल्यानंतर ट्विट करताना दिल्लीच्या आमदार तथा गोवा डेस्क प्रभारी आतिशी यांनी, गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना आपणाला आनंद होत आहे, असे म्हटले आहे.
पक्षाने जाहीर केलेले दहा उमेदवारांमध्ये हल्लीच भाजपचा राजीनामा देऊन आम आदमी पक्षात प्रवेश केलेल्या माजी मंत्री अलिना साल्ढाणा (कुठ्ठाळी), काही महिन्यांपूर्वीच भाजपचा राजीनामा दिलेले माजी मंत्री महादेव नाईक (शिरोडा), बरीच वर्षे भाजपचे कार्यकर्ते असलेले तसेच गोवा मांस प्रकल्पाचे माजी अध्यक्ष सत्यविजय नाईक (वाळपई), 2017 च्या निवडणुकीत मगोचे उमेदवार राहिलेले व नंतर आपमध्ये प्रवेश केलेले प्रेमानंद नानोस्कर (दाबोळी), गत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढून प्रतापसिंह राणे यांना तगडे आव्हान दिलेले विश्वजित कृ. राणे (पर्ये), एकेकाळी काँग्रेसची तोफ म्हणून ओळख निर्माण केलेल्या धडाडीच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो (नावेली), यांच्यासह डॉम्निक गावकर (कुडतरी), अमित पालेकर (सांताप्रुझ), वेन्झी व्हिएगश (बाणावली) आणि अभिजीत देसाई (सांगे) यांचा समावेश आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या गोवा भेटीत आप सत्तेत आल्यास ’भंडारी समाजाचा मुख्यमंत्री आणि ख्रिस्ती समाजाचा उपमुख्यमंत्री’ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उमेदवारी देताना त्यांनी पहिल्या यादीतच चार भंडारी आणि चार ख्रिस्ती उमेदवारांना स्थान दिले आहे. यावरून ते आपली वचनपूर्ती करतील हे सिद्ध होत आहे. लवकरच दुसऱया यादीची घोषणा होण्याची शक्यता असून त्यात आणखी भंडारी उमेदवारांचा समावेश असेल असे सांगण्यात आले आहे.









