नवरी मुलगी सत्या हिच्या प्रार्थनेचा परिणाम काय झाला पहा –
नोवरीचे संकल्प ऐसे । जाणोनि हृदयस्थे परेशें ।
वृषभदमना परमोल्लासें । उडी घातली सभाङ्गणीं।
अरिष्ट दमिता जो श्रीपति । आपुल्या करूनि सप्तधा मूर्ति । तैसाचि सप्त वृषभांप्रति । निग्रही निगुती लीलेनें ।सर्व जनासि नयनानंद । कर्ता श्रीहरि परमानंद । लीलेकरूनि सप्त बलिवर्द । खेळवी विनोद दावावया। मसतकीं हाणोनियां थापा । सप्त वृषभां आणी कोपा । सवेंचि धरूनि सातही शेंपा। वोढी वत्सपांसम वत्सा ।।गगना विंधतां तीष्ष्ण बाण। वृथा जाय जेंवि संधान । तेंवि वृषांचीं शृंगें तीक्ष्ण । हाणिता कृष्ण गवसेना ।वृषभा हाणितां टिरीवरी । तो परतोनि शृंगें मारी। तंव पुढें ठाकोनियां मुरारि । प्रतापें धरी शृंगाग्रा बस्त उन्मत्त मस्त जाले । परी कुंजरें धरितां सुटिका न चले । तेंवि सप्तधा होऊनि सप्त मोकळे । वृष आकळिले घननीळें शृंगीं । धरूनि शतधनुष्यें । मागें लोटिलें पुराणपुरुषें । सवेंचि सप्ताचीं धरूनि पुसें । वोढी आवेशें फरफरा ।
सत्याच्या मनातील भावना त्या हृदयस्थ भगवंताने जाणल्या आणि तिचे समाधान करण्यासाठी कृष्णाने त्या उन्मत्त बैलांसमोर मोठय़ा आनंदाने उडी घेतली. श्रीहरी हा अरिष्टांचे, संकटांचे दमन करणारा आहे. त्याने सात रूपे घेतली आणि सात बैलांशी तो एकाच वेळी झुंज देऊ लागला.
सगळय़ांच्या मनाला आनंद देणारा तो श्रीहरी आपला खेळ दाखवू लागला. त्या बैलांच्या शेपटय़ा पिरगळून तो त्यांना रागावर आणीत होता. ते चिडून शिंगाने हल्ला करीत. पण धनुष्यातून सुटलेले बाण नेम चुकला तर फुकट जातात तसा त्यांच्या शिंगांचा हल्ला फुकट जात होता. कृष्णाने बळाने त्यांच्या शेपटय़ा पकडून त्यांना फरफरा ओढले. त्यांच्यावर मुष्टीप्रहार करून त्यांना दमवले.
ऐसें कौतुक सभेच्या जनां । दाविता जालायादवराणा । विशेष नाग्नजितीच्या मना। संशयनिरसनालागूनी । हें ऐकोनि श्रोते जन । म्हणती तयेसी संशय कोण । कृष्णी आसक्त तियेचें मन । जाणोनि वधूगण उपहासी ।
कृष्ण कमनीय नोवरा खरा । रुचला तुझिया अभ्यंतरा । परंतु यातें बहुत दारा । तुज शेजारा कैं जोडे ।
इत्यादि स्त्रियांच्या उपहासवचनीं । संशयापन नृपनंदिनी ।
जाणोनि सप्तधा चक्रपाणि । होऊनि दमनीं वृष बांधे बहुधा रूपें धरूनि हरि । असपत्नभावें रमवी नारी । ऐसा संशय करूनि दुरी । स्वयें नोवरी प्रोत्साही। येऱहवीं एकला सातां जणां । समर्थ असतां वृषनिग्रहणा । सप्तधा जाला त्या कारणा । श्रोत्यां सज्जनां सूचविलें
असे कौतुक तो यादवराणा लोकांच्या सभेत दाखवत होता. विशेष करून नवरी सत्याच्या मनातील संशयाचे निरसन करण्यासाठी तो ही लीला करीत होता, असे महामुनी शुकदेव सांगतात. हे ऐकून श्रोत्यांनी प्रश्न केला की त्या नवरीचे मन कृष्णाने वेधले होते, मग तिच्या मनात कोणता संशय
आला?
देवदत्त परुळेकर








