पल पल छिन छिन बीता जाये
इक छिन तो अंदर झाँको
ऐसे पल छिन जुड जायें गर महाकाल कहते वाको
जाणाऱया काळाची किंवा निसटून जाणाऱया क्षणांची जाणीव आपल्याला कितीशी असते हा मोठाच विषय आहे. कारण आपण सगळे आपल्याच नादात असतो. घडय़ाळाच्या काटय़ावर धावत असतो प्रत्येकजण. आपण सेट केलेलं ध्येय गाठण्यासाठी सारखं सारखं वेळ मॅनेज करत टार्गेट पूर्ण करत आपण फक्त धावत राहतो. बाहेर बघायला आपल्याला सांगावं लागत नाही. आणि ही बहुरंगी बहुढंगी दुनिया कितीही बघितली तरी का कोण जाणे पण समाधान मिळत नाही. आणि जेव्हा या घाईला एकाएकी अर्जंट ब्रेक लागतो, म्हणजे तो लावावाच लागतो तेव्हा जाग्यावर बसून करायचं काय, हा मोठाच प्रश्न उपस्थित होतो, जसा कोरोनाच्या (अव) कृपेने आता सर्वांना अनुभव येतो आहे. शरीर एका दिशेला धावत असतं आणि मन भलत्याच दिशेला भरकटत असतं हे तर आमचं नित्याचंच. पण आता शरीर कंपल्सरी ठाणबंद आहे तर कधीतरी मनात डोकावून पहावं ना! पण नाही. त्यासाठी मनाला स्वतःत डोकावून पाहण्याची किंवा क्षणस्थ होण्याची सवय लागलेली असावी लागते. भल्या पहाटे उठून तानपुरा किंवा काय असेल ते वाद्य हातात घेऊन मजबूतपैकी रियाज करणारी एक जमात या पृथ्वीतलावर राहते. तिला हे प्रश्न पडणार नाहीत की घरी बसून करायचं काय. उलट कधी एकदा मनासारखा रियाज करायला मिळतो यासाठी हे जीव अक्षरशः आसुसलेले असतात.
होय. मी अर्थातच आमच्या कलाकार जमातीविषयीच बोलते आहे. त्यातल्या बऱयाचशा धन्य धन्य मंडळींचं असंही (स्वतःच्या मनाशी) मत झालं असेल की कारण काय असेल ते असो, पण जे काही आपण शिकलो त्यावर चिंतन करायला आणि नवे प्रयोग करायला परमेश्वराने कृपावंत होऊन बराच वेळ दिला! यातला गंमतीचा भाग सोडला तर कलाकारांना खरोखरच भूक असते ती रियाजाची. व्यावसायिक कलाकार म्हणून त्यांना फार मेहनत करावी लागते. त्या त्या वेळेसाठी वेगळी तयारी करावी लागते. लाइव्ह कार्यक्रम असेल तर समोरच्या श्रोतृवर्गाच्या मानसिकतेचा विचारही टाळता येत नाही. आपल्याला समोरच्याला काय द्यायचं आहे हे पक्कं असावं लागतं. वेळी-अवेळी रेकॉर्डिंग असणे किंवा कार्यक्रम असणे आणि तो कधीही ‘वेळी’ सुरू न होता ‘अवेळीच’ सुरू होणे हे दुखणं तर नेहमीचंच असतं. कलाकार हाही एक माणूस आहे. जागरणाचा किंवा वेळेला अजिबात न्याय न मिळण्याचा त्यालाही त्रास होतो असं म्हटलं तर माणसं हसतात. ‘तुम्हाला तर सवय असते या सगळय़ाची ही ही ही!’ असं दात विचकून माणसं मोकळी होतात. या सगळय़ाचा एकत्रित वादसंवाद अंतर्मनात सतत चालू राहतो. त्याबरोबर रोजचा रियाज आणि रोजचा सामान्य माणसाचा दिवस यातलं अंतर्द्वंद्व तर कायमचंच. या सगळय़ात सुरांशी हवा तसा एकांती संवाद होत नाही. मग एकदा रियाजाला बसल्यावर मन उठायला तयार नसतं. तानपुरा खुणावत असतो पण सांसारिक आणि व्यावहारिक कर्तव्य हाका मारून बोलवत असतात. उठणं प्राप्त असतं. मग स्वतःशी संवाद करायचाच राहतो. आपुलाचि वाद आपणासी!
आपल्या पूर्वसूरींना पक्की जाण होती की आपल्याला जर आयुष्यभर स्वतःची बुद्धी शाबूत ठेवायची असेल तर एकाग्रता महत्त्वाची आणि त्यासाठी काहीवेळ तरी ध्यानधारणा आणि चिंतन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण सांसारिक चिंता आणि जगण्याची धडपड हे सगळं कायमचंच असतं. म्हणूनच तो वेळ पूर्णपणे स्वतःसाठी काढलेला असे. आजूबाजूला संपूर्ण शांतता, कुणालाही/कुणाचाही उपसर्ग मुळीच नाही. ब्राह्ममुहूर्ताची दिवसाच्या सुरुवातीची वेळ आणि सुरेल जुळलेला तानपुरा एवढी सामग्री बस्स! दिल खोल के लावलेला ओंकार आपोआप विश्वाच्या तळाशी असलेल्या अपार, गहन शांततेच्या वाटेवर आपल्याला बोट धरून चालवत न्यायला लागतो. त्यावेळी मनात वेडेवाकडेच काय पण सरळ विचारही येत नसतात. कारण आपण आपले नसतोच. आपलं अस्तित्व केव्हाच त्या विराट शांततेत विरून गेलेलं असतं. तेव्हा किंचित चुकलेलं पाऊलही जोराने वाजतं. मग त्या सुराला पुन्हा पुनः पुन्हा आळवत आळवत योग्य वाटेवर घेऊन यायचं. तेव्हा मनाची जी अवस्था सुरू असते तिला आनंदलहरी उसळणं वगैरेही म्हणता येत नाही. कारण आनंद तरी वेगळा कुठे उरलेला असतो?
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाचे अशी स्थिती असते. जेव्हा सगळे स्वर मनासारखे लागतात आणि आवाजाचं बॅकग्राऊंड तयार होतं तेव्हा तोपर्यंत दम धरून असलेलं हे मन उधळतं आणि मनात ठाण मांडलेल्या रागाचे स्वर गळय़ातून अनावरपणे उसळून बरसू लागतात. रोजचं वास्तव किंवा कुणीतरी माणूस यांची हाक आल्याशिवाय मग भौतिक जगात कोण उतरतंय? आणि सध्या चाललंय तसं असेल तर? मग मनसोक्तपणे आपुलाचि वाद आपणासी!
आता प्रश्न एवढाच उरतो की हे असं क्वारंटाइन करण्यासाठी नेहमी काही महामारी किंवा जगबुडी यायला हवी का? दुसरं काही करण्यासारखं नाही म्हणून बसला स्वतःशी संवाद करत असंच कशाला पाहिजे? पण आमच्या गुणीजनांना गर्दीतही स्वतःला एकटं ठेवण्याची किमया साधलेली असावी असं वाटतं. कारण जेव्हा जगाकडून फटके खाण्याच्या वेळा येतात तेव्हा कळवळून जातानाही त्यांना गाणं आठवतं. मग तो माणूस देहाने प्रवासात असतो, स्टेजवर असतो, माणसांच्या गर्दीत असतो, पण मनाने तो पूर्ण एकटा असतो आणि सतत त्याच्या मनात विचाराबरोबर सूरही रेंगाळत राहतात. ती भावावस्था कदाचित एखादं नवीन काही जन्माला घालणारी असते. कारण आघात मनावर आणि मदार गाण्यावर असं असतं. जे मनात तेच ध्यानात आणि मग तेच गाण्यात! असा हा प्रवास असतो. चाहत्यांचा गराडा, पारितोषिकं, अमाप कीर्ती, ऐश्वर्य अशा सर्व गोष्टी आपुलाचि वाद आपणासी करण्यात खरं तर बऱयाचदा अडचणीच्या ठरत असतात. अर्थात उत्तम कलाकाराच्या निर्विवाद यशाचीच ती पावती असते. पण ज्यामुळे ते यश मिळालं तो रियाज, चिंतन सोडून चालतच नाही. म्हणूनच सातत्याने व हेतुत: विशिष्ट कालावधीनंतर हा एकांतवास प्रत्येक कलाकार खुशीने पत्करू इच्छितो जिथे या बाह्य उपाधी त्यांच्या अंत:संवादात अडथळा आणत नाहीत. परंतु पुढे पुढे जसा तो त्याच्या क्षेत्रात अधिकाधिक प्रगल्भ होत असेल तेव्हा सत्पुरुषांना जशी सहज समाधी? प्राप्त होते तशीच गर्दीत राहूनही त्याला हा एकांतवास आणि स्वतःशी संवाद करणं साधत असावं आणि मग तो त्याचा देह स्वभावच बनून राहत असावा. नाहीतरी सूर मनात सततच वाजत असल्याशिवाय एवढी हुकूमत कुठून साधावयाची? तो संवाद स्वतःचा स्वतःशी.. बाहेरून कसा दिसणार बरं?
अपर्णा परांजपे प्रभु








