खासदार, आमदारांप्रमाणेच नगरसेवकही विकत घेतले. अविश्वास ठरावातील आरोप फेटाळले. आपले पेनल सोडून गेलेल्या नगरसेवकांनी भाजप उमेदवारीवर निवडून दाखवावे.
डिचोली / प्रतिनिधी
आज देशाच्या राजकारणात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आपले खासदार आमदार निवडून न आणता त्यांना थेट विकतच घेऊन आपली सत्ता स्थापन करण्याचा सपाटा लावला असताना त्यांंनी हा प्रयोग साखळी नगरपालिकेत केला आणि आपल्या स्ट्रेटजीत भाजप आज यशस्वी ठरले. मात्र आपल्या पेनलमधून निवडणूक लढवून विजयी झालेल्या व आज दुसऱया गटात समावून दगाफटका केलेल्या नगरसेवकांनी राजिनामा देत भाजपच्या उमेदवारीवरून निवडणूक लढवावी आणि ती जिंकून दाखवावी, असे आव्हान साखळीचे पदच्युत नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी फुटलेल्या नगरसेवकांना दिले आहे.
सत्ता असणे आणि जाणे हा राजकारणाचा एक भाग आहेच. मात्र देवाच्या समक्ष उभे राहून आपण एकाच पेनलमध्ये एकसंध राहणार अशी शपथ घेणारे नगरसेवक आज माणसांचाच नव्हे तर देवाचाही विश्वासघात करतात म्हटल्यावर या जगात आणि कोणावर विश्वास ठेवावा ? असा सवाल यावेळी धर्मेश सगलानी यांंनी उपस्थित केला. गेल्या निवडणुकीत आपल्या पेनलमधून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना विजयी होण्यासाठी आपण स्वतः मदत केली होती. व त्यावरच ते निवडणूक आले होते. आज त्यांनी हिंमत असल्यास नगरसेवक पदाचा राजिनामा देत भाजपच्या उमेदवारीवर निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान धर्मेश सगलानी यांनी यावेळी केले.
अविश्वास ठरावातील आरोपांचे खंडन
अविश्वास ठरावात आपल्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन करताना, आपण व्यवसायात व्यस्त राहिलो तरी साखळी नगरपालिकेच्या किंवा लोकांच्या कामांमध्ये कधीच दिरंगाई केली नाही. त्या कामांसाठी आपण सदैव तत्पर असायचो. तसेच मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आपण साखळी नगरपालिका क्षेत्रात सरकारच्या विरोधात असतानाही सुमारे 12 कोटींची विकासकामे केली होती. तर या दोन वर्षांच्या काळात सुमारे 2 कोटींची विकासकामे केली आहेत. साखळीवासीयांचे राहणीमान सुसह्य आणि सुरळीत व्हावा यासाठी आपण सदैव नवनवीन योजना आखत लोकांना योग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला, असे धर्मेंश सगलानी यांनी सांगितले.
गैरहजर नगरसेवक आमचाच समर्थक, योग्यवेळी आमच्याबरोबर येणार.
अविश्वास ठरावावरील चर्चा व मतदानावेळी नगरसेवक दामू घाडी हे अनुपस्थित राहिल्याने धर्मेश सगलानी गटाकडे पाचच नगरसेवकांचे बळ राहिले. तर विरोधात सात नगरसेवकांचे बळ राहिले. गैरहजर राहिलेले नगरसेवक दामू घाडी हे धर्मेश सगलानी पेनलमधूनच निवडून आलेले आहेत. त्यांच्याविषयी विचारले असता सगलानी यांनी सांगितले की, गैरहजर राहिलेल्या नगरसेवकाने आजची बैठक का चुकविली ते आपल्याला माहित नसून ते आमच्याच गटाचे आहेत. व ते आमच्याच बरोबर राहणार असून योग्यवेळी ते आमच्या गटात सामील होणार आहे. अशी प्रतिक्रिया दिली.









