तुमच्याकडे जिद्द आणि कौशल्य असेल तर वय, परिस्थिती, पार्श्वभूमी यापैकी काहीही आड येत नाही. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही कोणतंही आव्हान अगदी सहज पेलू शकता. 70 वर्षांच्या सुमन धामणे यांच्याबद्दलही असंच म्हणता येईल. सुमन यांनी नातवाच्या मदतीने पाककृतींचं यू टय़ूब चॅनेल सुरू केलं आहे. त्यांच्या चॅनेलला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच त्यांनी मसाल्यांचा व्यवसायही सुरू केला आहे.
अहमदनगरच्या सारोळा कासार गावच्या सुमन धामणे कधीही शाळेत गेल्या नाहीत. इंटरनेट, यू टय़ूब, स्मार्टफोनशी त्यांचा कधी संबंधच आला नाही. शेतात राबणार्या सुमन आजी स्वयंपाकात हुशार. त्यांच्या हाताला चांगली चव आहे. आजीच्या हातची पावभाजी खाल्ल्यानंतर त्यांच्या नातवाला म्हणजे यश पाठकला अशा पद्धतीने पाककृतींचं यू टय़ूब चॅनल सुरू करण्याची कल्पना सुचली. यशने आजीला पावभाजीच्या काही रेसिपी दाखवल्या. त्या बघितल्यावर मी यापेक्षा काही तरी वेगळं करू शकते, असं म्हणून सुमन यांनी मस्त पावभाजी बनवली. सगळ्यांना पावभाजी खूप आवडली. सुमन यांनी पावभाजीत आपल्या पद्धतीने काही बदल केले होते. साधारण जानेवारी महिन्यात हा प्रसंग घडला आणि त्यानंतर आपली आजी या यू टय़ूब वाहिनीची मुहुर्तमेढ रोवली गेली.
यशने थोडंफार नियोजन आणि प्रयत्न करून आजीसोबत पहिला व्हिडिओ तयार केला. सुमनआजींनी कारल्याची रेसिपी दाखवली. मार्च महिन्यात हा व्हिडिओ अपलोड झाला आणि या व्हिडिओला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मग हळूहळू इतर रेसिपी अपलोड होऊ लागल्या. सुमनआजींनी शेंगदाणा चटणी, हिरव्या पालेभाज्या, वांग्याची भाजी, मिठाया असं बरंच काही दाखवलं. पाहता पाहता आपली आजी या वाहिनीच्या सबस्क्रायबर्सची संख्या वाढत गेली. सुमन आजींनी नुकतीच बाकरवडीची रेसिपी दाखवली. फक्त दोन आठवडय़ांमध्ये जवळपास दोन लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला. यामुळे सुमन आजींनाही हुरूप आला. सुरूवातीला सुमन आजी थोडय़ा बावरल्या होत्या. त्या आयुष्यात पहिल्यांदा कॅमेर्यासमोर उभ्या राहात होत्या. बोलताना चुकायच्या, अडखळायच्या. पण या सगळ्यावर मात करत त्या आत्मविश्वासाने कॅमेर्यासमोर उभ्या राहिल्या. प्रयत्न करून बघू, असं म्हणून त्यांनी नव्या प्रवासाला सुरूवात केली. आज त्या सुप्रसिद्ध झाल्या आहेत. सुमनआजींना यू टय़ूब क्रिएटर्स पुरस्कारही मिळाला असून कुटुंबिय तसंच आप्तेष्टांकडून त्यांचं खूप कौतुक होत असतं. आता त्या यू टय़ूब स्टार झाल्या आहेत. त्यांनी आपली आजी या ब्रँडचे मसालेही तयार केले आहेत. या मसाल्यांमुळे पदार्थांना वेगळीच चव येते. घरगुती मसाले हीच आजींची खासियतही आहे. मध्यंतरी त्यांचं चॅनल हॅकही झालं होतं. पण नंतर ते पूर्ववत झालं. सुमन आजी आपल्या 30 एकर शेतात राबत असतात. आता वेगवेगळ्या पाककृती दाखवणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सणावारानिमित्तानेही त्या मराठी मातीतल्या पारंपरिक पाककृती दाखवणार आहेत. सुमन आजींच्या या प्रयत्नांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.









